-साखरखेर्डा व शिंदी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; पुष्पगुच्छ, पुस्तके व वृक्षारोपणाने विद्यार्थ्यांचे स्वागत
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची १०० टक्क्यांहून अधिक उपस्थिती नोंदविण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पुस्तके आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात स्वागत करण्यात आले.
साखरखेर्डा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (कन्या) आणि जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा अशा तीन शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश पालकांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव आणि सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेची पटसंख्या १०० असताना तब्बल १०५ विद्यार्थी उपस्थित राहिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. जिल्हा परिषद कन्या शाळेतही विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेतही विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकांशी संपर्क साधला व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. शाळेच्या परिसरात स्वागत फलक लावण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांचे वाढदिवसही साजरे करण्यात आले. स्वागतगीत सादर करण्यात आले असून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांनी गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख संतोष सरकटे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
शिंदी येथेही शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
सिंदखेडराजा पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शिंदी येथेही ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने झाली. “जिल्हा परिषद शाळा आपल्या हक्काची” आणि “जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या, उच्च शिक्षण घ्या” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून जनजागृती केली. यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षण समितीचे सदस्य आणि शिक्षकवृंद यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रभातफेरीदरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरखेर्डा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अच्युतराव खरात आणि सेवानिवृत्त शिक्षक विश्वासराव खरात यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.