-रानवडे परिवारातील तिन्ही अर्जदारांना सुवर्णमध्य; जिल्हानिहाय सेवा वाटप, देवस्थानची अंतिम मान्यता
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात रथासाठी बैलजोड सेवा देण्यावरून निर्माण झालेला वाद अखेर सामोपचाराने मिटला आहे. बैलजोड निवड समितीने रानवडे परिवारातील तिन्ही अर्जदारांना सेवेची संधी देण्याचा निर्णय घेतल्याने या वादावर पडदा पडला आहे.
नव्या निर्णयानुसार, पुणे जिल्ह्यासाठी हर्षवर्धन रानवडे, सातारा जिल्ह्यासाठी उमेश रानवडे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी तुळशीराम रानवडे हे अनुक्रमे बैलजोड सेवा देणार आहेत. पालखी सोहळ्याची परंपरा आणि वारकरी भाविकांच्या भावना लक्षात घेऊन समितीने सेवा विभागून देण्याचा सुवर्णमध्य साधला आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी आळंदी देवस्थानने पुढाकार घेत सलग सात तास बैठक घेतली. बैठकीत दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका मांडण्यात आली. आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यात आला. या निर्णयाचे रानवडे परिवारातील तिन्ही मानकाऱ्यांनी स्वागत केले असून, यापूर्वी झालेला पत्रव्यवहार, न्यायालयीन प्रक्रिया आणि देवस्थानला देण्यात आलेली नोटीस मागे घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. वाद मिटल्याने कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
काय होता वाद?
सन १९८२ पासून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासाठी बैलजोड सेवा देण्यासाठी आळंदीतील ग्रामस्थांकडून अर्ज मागवून रोटेशन पद्धतीने सेवा दिली जाते. यंदा रोटेशननुसार ही सेवा रानवडे परिवाराकडे येत होती. मात्र, कुटुंबात एकमत न झाल्याने उमेश रानवडे यांनी स्वतःला प्राधान्य देण्याची मागणी करत लाक्षणिक उपोषण केले होते. समितीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र तो न मान्य झाल्याने न्यायालयात जाण्याची भूमिकाही घेण्यात आली होती. दरम्यान, समितीने स्थळ पाहणी केली असता उमेश रानवडे यांच्याकडे बैलजोड आणि गोठा नसल्याचा अहवाल समोर आला. त्यानंतर समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल करून आवश्यक चौकशीची मागणी केली होती. सुरुवातीला समितीने स्वतः बैलजोड सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र अखेर तिन्ही अर्जदारांना जिल्हानिहाय सेवा देण्याचा समन्वयात्मक निर्णय घेऊन वादावर कायमचा तोडगा काढण्यात आला.
देवस्थानची अंतिम मान्यता
समितीच्या निर्णयावर आळंदी देवस्थानने अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे यंदाचा पालखी सोहळा बैलजोड सेवेच्या वादाविना शांततेत, परंपरेनुसार आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीला समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, सदस्य नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रमेश कुऱ्हाडे, रामदास भोसले, शिवाजीराव रानवडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.