– नसरापूर चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरण: गुन्हा घडल्यापासून अवघ्या ५८ दिवसांत ऐतिहासिक निकाल
– १५ दिवसांत १,२०0 पानांचे दोषारोपपत्र; ५५ साक्षीदारांमुळे नराधम अडकला
– न्यायालयात अश्रूंचा बांध: ऐतिहासिक निकाल ऐकताच पीडितेच्या माता-पित्याला अश्रू अनावर!
– १५ दिवसांत १,२०0 पानांचे दोषारोपपत्र; ५५ साक्षीदारांमुळे नराधम अडकला
– न्यायालयात अश्रूंचा बांध: ऐतिहासिक निकाल ऐकताच पीडितेच्या माता-पित्याला अश्रू अनावर!
पुणे (सोनाली बडगुजर) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम आरोपीला आज (दि. 29 जून) पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा गुन्हा ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ (Rarest of Rare) असल्याचा स्पष्ट निर्वाळा देत आरोपी भीमराव कांबळे याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या ५८ दिवसांत लागलेला हा निकाल राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलदगतीने लागलेला पहिलाच निकाल ठरला आहे. न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल सुनावताच कोर्टात उपस्थित असलेल्या पीडितेच्या माता-पित्याला आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचा भक्कम आधार घेत न्यायालयाने आरोपीला कोणतीही दया दाखवण्यास नकार दिला.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकालपत्राचे वाचन करताना आरोपीच्या अमानुष कृत्याचा कडक शब्दांत निषेध केला. न्यायालय म्हणाले,
“हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ या श्रेणीत मोडतो. आरोपीने दाखवलेली क्रूरता आणि चिमुरडीला दिलेला त्रास अमानुष होता. मुलीच्या शरीरावर तब्बल १८ जखमा होत्या. स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीने अत्यंत असहाय्य बालिकेचा बळी घेतला. हत्येनंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि तिला जिवंत राहण्याचा कोणताही मार्ग सोडला नाही. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमाला केवळ त्याच्या वयाचा विचार करून माफी देण्यालायक स्थितीत न्यायालय नाही.”
तपासादरम्यान सरकारी पक्षाने आरोपी भीमराव कांबळे याचा गंभीर गुन्हेगारी पूर्वइतिहास न्यायालयासमोर आणला. आरोपीने यापूर्वी ५३ वर्षांचा असताना स्वतःच्याच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय एका वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला आणि दुसऱ्या एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. यावरून आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याला कायद्याची कोणतीही भीती किंवा पश्चात्ताप नव्हता, हे सिद्ध झाले.
१ मे २०२६ रोजी ही काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद आणि वेगवान कामगिरी केली. पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत सुमारे १,२०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी या प्रकरणात सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ विविध निकालांचे दाखले न्यायालयात सादर केले. डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आणि ५५ साक्षीदारांच्या भक्कम साक्षींमुळे हा खटला अवघ्या दोन महिन्यांच्या आत तडीस नेण्यात यश आले.
तपास ते फाशी: ५८ दिवसांचा घटनाक्रम
- १ मे २०२६ (संध्याकाळ): नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली; काही वेळातच तिचा मृतदेह आढळला. लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल.
- २ मे २०२६: पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित भीमराव कांबळेला अटक केली.
- मे चा पहिला आठवडा: शवविच्छेदन आणि डीएनए नमुने जप्त. नसरापूर, भोर परिसरात जनतेचा तीव्र संताप आणि निषेध आंदोलने. पोलिसांनी घटनास्थळाची पुनर्रचना (Crime Scene Reconstruction) केली.
- १६ मे २०२६: पोलिसांकडून अवघ्या १५ दिवसांत विशेष न्यायालयात १,२०० पानांचे आरोपपत्र (Charge Sheet) दाखल.
- २८ मे २०२६: न्यायालयाकडून आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, सुनावणीला सुरुवात.
- जून २०२६: दैनंदिन सुनावणीत ५५ साक्षीदार आणि वैज्ञानिक पुराव्यांची तपासणी पूर्ण.
- २० जून २०२६: दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद सुरू; सरकार पक्षातर्फे फाशीची मागणी.
- २९ जून २०२६: विशेष न्यायालयाकडून आरोपी भीमराव कांबळेला फाशीची ऐतिहासिक शिक्षा जाहीर.