बुलढाणा जिल्ह्यातील ७,५४५ हेक्टरसाठी १९ कोटी; आमदार श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्याला यश!
बुलढाणा / मुंबई (बाळू वानखेडे) : मार्च, एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना तातडीची आर्थिक मदत म्हणून ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील २ लाख ६७ हजार ६५६ शेतकरी आणि १ लाख ६३ हजार ७८८ हेक्टर क्षेत्राला थेट फायदा होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानीसाठी भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भरीव निधी खेचून आणण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
अवकाळी पावसामुळे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अमरावती विभागातील या दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण १९ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे, आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी शासनाकडे लावून धरलेल्या तगाद्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील १२,०५२ शेतकऱ्यांच्या ६,७८८.६३ हेक्टर क्षेत्रासाठी एकट्या बुलढाणा जिल्ह्याला १८ कोटी ९० लाख ३९ हजार रुपये मिळणार आहेत. (उर्वरित ९६.२६ लाख रुपये अकोला जिल्ह्यातील १,४७६ शेतकऱ्यांना मिळतील). दरम्यान, एवढा मोठा निधी मंजूर झाल्याने आता जिल्ह्यातील स्थानिक राजकीय वर्तुळात या मदतीचे श्रेय घेण्यासाठी विविध नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या आपत्तीत कोकण किनारपट्टीला निसर्गाचा मोठा फटका बसला. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ३६ हजार ७५१ शेतकरी यामुळे बाधित झाले असून, ९२,३६२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कोकणातील आंबा आणि काजू फळबागांचे अतोनात नुकसान झाल्याने राज्य सरकारने या विभागासाठी सर्वाधिक २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आंबा-काजू उत्पादकांना मोठा आधार मिळाला आहे.
विभागवार मंजूर झालेली मदत एका नजरेत:
| विभाग / जिल्हे | बाधित शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) | मंजूर निधी (रुपयांत) |
| कोकण विभाग (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) | १,३६,७५१ | ९२,३६२.७८ | २०९ कोटी १० लाख ६ हजार |
| नाशिक विभाग (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर) | १,२९,८९६ | ५५,५५५.९० | १०३ कोटी ३२ लाख ७७ हजार |
| अमरावती विभाग (अकोला व बुलढाणा) | १३,५२८ | ७,५४५.९४ | १९ कोटी ८६ लाख ६५ हजार |
| नागपूर विभाग (भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, चंद्रपूर) | १४,६१३ | ८,१६०.५३ | १७ कोटी ३४ लाख ९७ हजार |
| पुणे विभाग (सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) | ३,७६२ | २,२४१.३० | ४ कोटी ३१ लाख १ हजार |
| छत्रपती संभाजीनगर विभाग (छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर) | २,५०६ | १,९२३.२० | २ कोटी २ लाख ७९ हजार |
| एकूण महाराष्ट्र | २,६७,६५६ | १,६३,७८८.७५ | ३३४ कोटी ९८ लाख |
“राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हा सरकारचा शब्द होता. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तातडीने ३३४.९८ कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.”
– मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य.
नाशिक विभागातील ५५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रासाठी १०३ कोटींहून अधिकचा निधी मंजूर झाला असून, पश्चिम महाराष्ट्रातील (पुणे विभाग) ३,७६२ शेतकऱ्यांनाही ४ कोटी ३१ लाखांचा दिलासा मिळाला आहे. हा निधी लवकरात लवकर जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.