-डॉ. रणजीत मंडाले यांची जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती; तळागाळातील आरोग्य सेवा बळकट करण्याचा निर्धार
-ग्रामीण आरोग्य सेवेत दीर्घ अनुभव; आरोग्य योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) पदाची जबाबदारी जिल्ह्याचे सुपुत्र तथा सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील रहिवासी डॉ. रणजीत मंडाले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शासनाने नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला अनुभवी आणि कार्यक्षम नेतृत्व लाभल्याची भावना व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे अधिकारी म्हणून डॉ. मंडाले यांची ओळख आहे. प्रशासनिक अनुभव, कार्यतत्परता आणि जनसामान्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबतची संवेदनशीलता यामुळे त्यांनी आरोग्य विभागात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी देवळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर मलकापूर-पांगरा प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी मेहकर येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणूनही यशस्वी कामगिरी बजावली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने त्यांची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शासनाच्या सर्व आरोग्य योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे डॉ. मंडाले यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. डॉ. रणजीत मंडाले यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होऊन सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.