-भवानी पेठेत ८ हजार चौरस फूट अतिरिक्त जागा उपलब्ध; भाविकांची गैरसोय टळणार – चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आषाढी पायी वारी सोहळ्यासाठी पुणे शहरात येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा २०२६ अंतर्गत यावर्षी पुण्यात माऊलींच्या पालखी मुक्कामासाठी सुमारे ८ हजार चौरस फूट अतिरिक्त प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरातील गर्दी कमी होऊन भाविकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा यांनी दिली.
येत्या ९ व १० जुलै २०२६ रोजी पुण्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे. या कालावधीत संपूर्ण पुणे शहर भक्तिरसात न्हाऊन निघते. माऊलींच्या दर्शनासाठी पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो भाविक पुण्यात दाखल होतात. चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा यांनी सांगितले की, “पुण्यातील भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरालगत तसेच समोरील बाजूच्या काही मिळकती आणि जागा पुणे महापालिका तसेच पुणेकर नागरिकांच्या विशेष सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा सुमारे ८ हजार चौरस फूट अतिरिक्त जागा पालखी मुक्कामासाठी सज्ज होणार आहे. या विस्तारामुळे मंदिर परिसर अधिक प्रशस्त होऊन पालखी सोहळ्याचे नियोजन अधिक सुटसुटीतपणे करता येणार आहे.”
भाविक आणि पुणेकरांना मिळणार अधिक चांगल्या सुविधा
या अतिरिक्त जागेमुळे भाविकांसाठी विविध सेवा-सुविधांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ यांनी सांगितले की, “दरवर्षी भवानी पेठ परिसरात वारकरी आणि दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत असते. जागेअभावी अनेकदा गैरसोय निर्माण होत होती. मात्र, आता ८ हजार चौरस फूट अतिरिक्त जागा उपलब्ध झाल्याने भाविकांसह स्थानिक पुणेकर नागरिकांना विविध सेवा-सुविधा पुरविताना येणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील.”
यंदाच्या वारीची प्रमुख वैशिष्ट्ये
- पुणे मुक्काम : ९ व १० जुलै २०२६ (दोन दिवस)
- मुक्कामाचे ठिकाण : पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ, पुणे
- नवा बदल : मंदिरालगतच्या जागांचा समावेश करून सुमारे ८ हजार चौरस फूट क्षेत्रवाढ
- फायदा : दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि इतर सुविधांचे अधिक प्रभावी नियोजन
भवानी पेठेतील या विस्तारामुळे यंदाचा माऊलींचा पुणे मुक्काम अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुखकर ठरेल, असा विश्वास आळंदी देवस्थान तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.