-मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब अर्पण करणाऱ्या महाराणा प्रतापांना रक्तदानातून अभिवादन
चिखली (अंकुश पाटील) : हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त चिखली व कव्हळा येथे आयोजित रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंबही अर्पण करणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या स्मरणार्थ एकूण १०४ रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांना आदरांजली वाहिली.
चिखली येथे आयोजित रक्तदान शिबिरात श्री सत्य साई ब्लड सेंटर, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच जीवनधारा ब्लड बँक, चिखली यांच्याकडे ३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचे व्रत जपले. याशिवाय महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती, कव्हळा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. अशा प्रकारे चिखली तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये एकूण १०४ जणांनी रक्तदान करून महाराणा प्रताप यांना अभिवादन केले. महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत रक्तदात्यांनी समाजसेवेचा संदेश दिला. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम समाजोपयोगी आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी व रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.