– ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’चा धोका; शरीरात संसर्ग वाढल्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू!
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर अन्नत्याग आंदोलन जिवावरच बेतले असते!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. शरीरातील तीव्र संसर्ग (इन्फेक्शन) आणि रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी यांमुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय गुंतागुंतीनंतर, त्यांना मध्यरात्री पुढील उच्चस्तरीय उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तरुण शेतकरी नेत्याच्या अन्नत्याग आंदोलन प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केला नसता तर हे आंदोलन तुपकरांच्या जिवावरच बेतले असते. विद्याधर महाले पाटील यांच्यासह तुपकरांच्या जवळच्या व्यक्तींमुळे तुपकर थोडक्यात बचावले आहेत.
सोयाबीन-कापूस उत्पादकांना आर्थिक मदत आणि शेतमालाला हमीभाव या मागण्यांसाठी तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनादरम्यान अन्नाचा कणही न घेतल्याने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घसरले होते. पाच दिवसांच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरात ‘किटोन’चे प्रमाण लक्षणीय वाढले असून, त्यांना ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’ या गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच किडनीच्या कार्यक्षमतेवर आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवरही याचा ताण पडल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, आंदोलनापूर्वी जवळपास महिनाभर तुपकरांवर वैद्यकीय उपचार सुरू होते.
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला असून अनेक ठिकाणी रास्ता रोको व बंद पाळण्यात आला होता. परंतु, रविकांत तुपकर यांची प्रकृती चिंताजनक झाली असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पण अभ्यासू व आक्रमक शेतकरी नेते असलेल्या तुपकरांच्या जिवाचे काही बरेवाईट व्हायला नको’ म्हणून तातडीने राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना शुक्रवारी आंदोलनस्थळी पाठवले होते. महाजन यांनी तुपकरांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने चार दिवसांचा वेळ मागितल्यानंतर, तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. आंदोलन स्थगित झाल्यानंतर तुपकरांना प्रथम बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने व प्रकृती आणखीच खालावल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सद्यस्थितीला तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.