-कार्यकर्त्यांचे पोलिस ठाण्यात निवेदन; हिवरा आश्रम येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न?
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकरी कर्जमुक्ती आणि मागील वर्षाचा पीकविमा मिळावा या मागण्यांसाठी बुलढाणा येथे बेमुदत उपोषण सुरू केले असून, त्यांच्या आंदोलनाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, हिवरा आश्रम येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे.
रविकांत तुपकर यांनी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात तसेच मागील वर्षाचा पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी बुलढाणा येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दरेगाव येथील आत्माराम बंगाळे, समाधान कणखर, प्रल्हाद काळुसे, शेरखान लालखा पठाण, मदन बंगाळे, गजानन काळे आणि समाधान गाडे यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले. निवेदनात रविकांत तुपकर यांना काही इजा झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हिवरा आश्रम येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. संबंधित इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू असून महसूल विभागाने तिचा ताबा घेतलेला नसल्याची माहिती मिळाली आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा उद्रेक तीव्र होत असून शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.