-आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक भूमिकेचा परिणाम; दोन ठिकाणी छापे, दोन आरोपी फरार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गेल्या अनेक वर्षांपासून साखरखेर्डा येथे सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक भूमिकेमुळे बुधवारी अन्न व औषध प्रशासन आणि साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणातील दोन आरोपी मात्र फरार झाले आहेत.
१७ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पी. एस. भोपळे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या सहकार्याने कारवाई केली. यावेळी शेख इब्रान शेख चाँद कुरेशी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत विविध प्रकारचा गुटखा साठवून ठेवलेला आढळून आला. हा गुटखा खुलेआम बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या ठिकाणाहून ६ लाख ७२ हजार ९११ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यानंतर पथकाने शेख मुस्ताक शेख खलील यांच्या निवासस्थानी छापा टाकला. तेथे १२ प्रकारचा गुटखा आढळून आला. पंचनामा केल्यानंतर ११ लाख ४९ हजार १० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. कारवाईच्या वेळी दोन्ही आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पी. एस. भोपळे, ठाणेदार गजानन करेवाड, पीएसआय गणेश डोईफोडे, पीएसआय बाजड, पोलीस कॉन्स्टेबल गजानन दराडे, दिनेश बकाले, युवराज राठोड, ज्ञानदेव टेकाळे, मनोज खर्डे, रोहिदास पवार, लक्ष्मण इनामे आणि जनाबाई केवट यांचा समावेश होता. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या अवैध व्यवसायाशी संबंधित आणखी काही आरोपी निष्पन्न होतात का, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, या धडक कारवाईची माहिती मिळताच गावातील अनेक पानटपऱ्या आणि किराणा दुकाने बंद झाली. सकाळपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे गावात काही काळ शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.