– बळीराजाचा राज्यकर्त्यांना थेट इशारा: शेतकऱ्यांचा अंत बघू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटेल!
– लोणार तालुक्यात बस पेटवली, खामगावात ‘एसडीओ’ कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न; जळगाव जामोदमध्ये तहसीलवर तर चिखलीत पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचा एल्गार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा वणवा अबालवृद्धांसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पसरला आहे! सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आणि प्रशासनाच्या कमालीच्या ढिम्मपणामुळे संतप्त झालेल्या बळीराजाचा संयम आता सुटला असून, जिल्ह्यात आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून तुपकरांची प्रकृती खालावत चालली आहे, तर दुसरीकडे संपूर्ण जिल्हा आश्वासनांच्या चिंधड्या उडवत रस्त्यावर उतरला आहे!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली मेहकर तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आरेगाव, डोणगाव, गोहगाव, आंध्रुड, जवळा, वर्दडा, हिवरा खुर्द, सोनाटी या गावांतून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या छाताडावर पाय देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. “शेतकऱ्यांचा अंत बघू नका! वेळीच तुपकरांच्या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा संपूर्ण रस्ते रोखून धरू!” असा थेट आणि आक्रमक इशारा डॉ. टाले यांनी दिला आहे. डोमरूळ, दहीद बुद्रूक, तांदूळवाडी, अटकळ, अंभोडा येथेही सरकारच्या निषेधाचे कडकडते पडसाद उमटले आहेत.
अन्नत्याग आंदोलनाचा काल (१६ जून) दुसरा दिवस होताच शेतकऱ्यांच्या भावनांचा तीव्र उद्रेक झाला. लोणार आगाराची मुक्कामी असलेली एसटी बस किनगाव जट्टू येथे आंदोलकांनी रात्री साडेदहाच्या सुमारास पेटवून दिली. तथापि, या घटनेशी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नसल्याची माहिती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसभरात ठिकठिकाणी सरकारच्या फसव्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी करण्यात आली, तर काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून संताप व्यक्त करण्यात आला. मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालय अज्ञात आंदोलकांनी पेटवून देण्याचा थरारक प्रयत्न केला. तिथे ‘शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे’ असे फलक झळकत होते.
चिखली-खामगाव रस्त्यावरील पेठ येथील पुलावर संतप्त शेतकऱ्यांनी भर रस्त्यात टायर पेटवून वाहतूक पूर्णपणे रोखून धरली, ज्यामुळे मोठी कोंडी झाली होती. आज, दि. १७ जून रोजी आंदोलनाची आग आणखी तीव्र झाली आहे. जळगाव जामोद येथे अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शेतकऱ्यांनी जोरदार ठिय्या मांडला आणि घोषणाबाजीतून परिसर दणाणून सोडला. तिकडे चिखली तालुक्यातील उदयनगर येथेही आंदोलक शेतकरी ‘शोले’ स्टाईलने पाण्याच्या उंच टाकीवर चढले असून गेल्या काही तासांपासून तिथे कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलढाणा शहरात तर ॲड. शर्वरीताई तुपकर यांच्या नेतृत्वात चक्क ‘भीक मागो’ आंदोलन करून गोळा झालेले भिकेचे पैसे थेट सरकारला पाठवून या नाकर्त्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला!
या ऐतिहासिक लढ्यात आता दूध उत्पादक शेतकरीही आपल्या मागण्यांसह ताकदीने उतरले आहेत. दुधाला न मिळणारा भाव आणि आर्थिक संकट यामुळे त्रस्त झालेल्या दूध उत्पादकांनीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुगत ऊर्फ सुगतानंद तुळशीराम भटकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या वज्रमुठीला जाहीर पाठिंबा दिला. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई खेडेकर, डी. एस. लहाने सर, सावजी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. एम. जाधव, शिंदे सर आणि प्रभुभाऊ काळवाघे यांनीही मैदानात उतरून आंदोलनाला बळ दिले आहे.
तुपकरांचे शांततेचे आवाहन: अन्नाचा कणही न घेतल्याने प्रकृती खालावत चाललेली असतानाही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. “मी लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहे, तुम्हीही कायदा हातात न घेता अत्यंत संयमाने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करा,” असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, बळीराजाचा हा उफाळलेला संताप पाहता, शासनाने तातडीने सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविम्याचा ठोस निर्णय घेतला नाही, तर हा वणवा संपूर्ण राज्याला वेढल्याशिवाय राहणार नाही!
आंदोलनाला हिंसक वळण लागले तर दयामाया नाही; तुपकरांनी कार्यकर्ते आवरण्याची गरज!
किनगाव जट्टूतील बस पेटविल्याप्रकरणातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हात झटकले!