— बस आग प्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कोणताही संबंध नाही; जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचे स्पष्टीकरण
बिबी (ऋषी दंदाले): किनगाव जट्टू बस स्थानकावर काल रात्री राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसला लागलेल्या आगीच्या घटनेशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा दुरान्वयेही संबंध नाही, असे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक चळवळीतील कार्यकर्त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
लोणार येथून सुटलेली आणि किनगाव जट्टू येथे मुक्कामी येणारी एसटी बस काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास बस स्थानकावर पोहोचली होती. त्यानंतर या बसला अचानक भीषण आग लागली. या घटनेनंतर, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बुलढाणा येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनीच ही आग लावल्याची चर्चा आणि काही बातम्या सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या. या अफवांवर आता संघटनेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.
“शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या आगीच्या प्रकरणाशी आमचा किंवा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा काहीही संबंध नाही.” — सहदेव लाड, जिल्हा उपाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना
लाड यांनी पुढे बोलताना सांगितले की, बसला आग नेमकी कशी लागली किंवा ती कोणी लावली असेल, तर पोलिसांच्या सखोल तपासातून ते समोर येईलच. पोलीस प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी, यात शंका नाही. मात्र, कोणत्याही पुराव्याविना केवळ चळवळीला आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना बदनाम करण्यासाठी अशा वावड्या उठवणे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते आणि तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.