– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा; संचालक-संपादक प्रवीण मिसाळ पाटील यांनी घेतली तुपकरांची भेट
– तुपकरांच्या ‘अन्नत्याग’ आंदोलनाचा दुसरा दिवस; सरकार अजूनही सुस्त; महिला सरपंचाने मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील बळीराजाच्या पाचवीला पूजलेले मरण आणि कफनचोर सरकारची मस्ती याविरोधात बुलढाण्याच्या मातीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा वणवा आता पेटला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी आणि हक्काच्या पीकविम्यासाठी शेतकरी नेते रविकांतभाऊ तुपकर यांनी पुकारलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दोन दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. परंतु, महाराष्ट्राच्या गादीवर बसलेले निर्दयी आणि गेंड्याची चामडी असलेले सरकार अजूनही ढिम्म हललेले नाही. शासनाचा एकही प्रतिनिधी या आंदोलनाकडे फिरकायला तयार नाही. “शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची ही सरकारची प्रवृत्तीच आहे,” असा घणाघाती हल्ला तुपकर यांनी केला असून, “माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जिम्मेदारी या राज्य सरकारची आणि प्रशासनाची राहील!” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संचालक-संपादक शिवश्री प्रवीण मिसाळ पाटील यांनी तुपकरांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रशासनाने डोळे मिटले तरी गावगाड्यातील शेतकऱ्यांनी हा लढा आता स्वतःच्या हातात घेतला आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेक शेतकरी, शेतमजूर आणि माता-भगिनींनी बुलढाण्याकडे कूच केली आहे. गावोगावी बैठकी सुरू असून, शिवश्री प्रवीण मिसाळ पाटील यांच्या मिसाळवाडी गावातूनदेखील शेकडो शेतकरी आंदोलनस्थळी निघाले होते.
दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, “काही जबाबदार अधिकारी जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांचे चमचे म्हणून काम करत आहेत. कर्जमुक्तीच्या या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांच्या पोटात पुरते दुखू लागले असून, हे आंदोलन दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आंदोलनस्थळी एखादा भ्याड हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याचा संशय आहे. असा काही प्रकार घडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल. आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होईल, तेव्हा सत्ताधारी नेत्यांना लपायला जागा मिळणार नाही; शेतकरी या नेत्यांना जोड्याने हाणायला मागे-पुढे पाहणार नाहीत!” असा रणकंदन करणारा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या वेदनांना रक्ताची शाई; सरकारचा संवेदनशीलतेचा पराभव!
या आंदोलनाला पाठिंबा देताना पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारच्या दारी पोहोचवला आहे. सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अशी मागणी या रक्ताने लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एका महिला सरपंचावर आपल्या रक्ताने पत्र लिहिण्याची वेळ येते, यापेक्षा या मिंधे सरकारच्या संवेदनशीलतेचा दुसरा मोठा पराभव कोणता असू शकतो? अशी संतप्त विचारणा आता जनतेतून होत आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा वाढता एल्गार!
या आंदोलनाभोवती आता सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांची वज्रमूठ आवळली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा जाहीर पाठिंबा मिळाला असून, पक्षाचे नेते बी. टी. जाधव आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरेशभाऊ शेळके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. “गरज पडल्यास आमचा पक्ष रस्त्यावर उतरून या लढ्यात थेट सहभागी होईल,” असा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच, शेतकरी नेते अजित नवले यांनी ‘किसान सभे’च्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून, जाचक अटी-शर्ती रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
माजी नगराध्यक्ष डॉ. गजानन पडघाण, माजी जिल्हाध्यक्ष चव्हाण साहेब (ग्रामसेवक संघटना), सेवानिवृत्त कृषी अधिकारी बबननाना जाधव, बंडूनाना शेळके, प्रभूशेठ बाहेकर, श्रीकृष्ण जेउघाले (मराठा अर्बन), सेवानिवृत्त विस्तार अधिकारी इंगळे साहेब, ॲड. काळवाघे, निसर्ग फाऊंडेशन, प्रा. डी. एम. कानडजे, विनायक वाघ (शेतकरी संघटना) आणि आर. डी. तायडे सर यांच्यासह अनेक शिष्टमंडळांनी तुपकरांची भेट घेऊन या रणसंग्रामाला बळ दिले आहे.
उद्या किंवा परवा शेतकरी रस्त्यावर उतरणार!
सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर उद्या किंवा परवा संपूर्ण बुलढाणा जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, असा थेट इशारा तेथे उपस्थित शेतकऱ्यांच्या गटातून ऐकायला मिळाला आहे. हा लढा आता एका व्यक्तीचा राहिलेला नसून, तो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि न्यायाचा महासंग्राम बनला आहे!