– अचानक शाईफेक आणि मारहाणीने खळबळ; दोन तरुण ताब्यात
– आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढणार; उद्या नागपुरात निदर्शने
जयपूर/नवी दिल्ली (आवेश तिवारी): ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमधील शहीद स्मारक येथे आंदोलनादरम्यान काही तरुणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. समर्थक दिपके यांना खांद्यावर घेऊन जात असतानाच जमावातील काही व्यक्तींनी त्यांच्यावर शाईफेक करत मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
जयपूरमधील या घटनेनंतर आता हे आंदोलन महाराष्ट्रातही तीव्र होण्याची शक्यता आहे. उद्या, १६ जून रोजी नागपुरातील संविधान चौक येथे दुपारी ४ वाजता दिपके यांच्या नेतृत्वाखाली शांततामय निदर्शने करण्यात येणार आहेत. नागपुरातील विद्यार्थी आणि तरुणांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे केले आहे.
NEET पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जयपूरमध्ये युवकांचे मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. अभिजित दिपके घटनास्थळी पोहोचताच समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. याच वेळी गर्दीत घुसलेल्या काही तरुणांनी दिपके यांना लक्ष्य करत मारहाण केली. या प्रकारानंतर संतप्त समर्थकांनी संबंधित तरुणांना पकडून चोप दिला; मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
‘शंभर हल्ले करा, पण गप्प बसणार नाही!’
हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिपके यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, “माझ्यावर कितीही हल्ले झाले तरी आम्ही हात उचलणार नाही. हिंसेचा आधार केवळ डरपोक लोक घेतात. तुम्ही एक नाही तर शंभर हल्ले करा, पण आमचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही. हे आंदोलन शांततामय मार्गाने सुरूच राहील.”
केंद्र सरकारवर टीका
आंदोलनादरम्यान दिपके यांनी NEET पेपरफुटीवरून केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्र्यांवर कडाडून टीका केली. “रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचा दावा करणारे ‘महामानव’ देशातील पेपरफुटी का थांबवू शकत नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, प्रश्न विचारणाऱ्यांना ‘पाकिस्तानी’ संबोधण्याच्या वृत्तीचाही त्यांनी तीव्र निषेध केला.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ‘CJP’ कडून देशभरात मोहीम राबवली जात आहे. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही पाठिंबा दर्शवला असून, दिपके यांना अटक झाल्यास त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.