-अनेक ठिकाणी टिनपत्रे उडाली, वृक्ष उन्मळून पडले; वीजेचे खांब कोसळल्याने रात्रभर वीजपुरवठा खंडित
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डासह परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी घरांवरील व गोठ्यांवरील टिनपत्रे उडाली, वीजेचे खांब कोसळले तर अनेक वृक्ष उन्मळून पडले. परिणामी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये रात्रभर अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
काल सायंकाळी साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, पिंपळगाव सोनारा, गोरेगाव, पांग्रीकाटे, बाळसमुंद्र, शिंदी, मोहाडी, सवडद, राताळी, दरेगाव, सायाळा, राजेगाव, कंडारी, भंडारी आणि जागदरी या गावांमध्ये वादळाचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. तसेच अनेक वृक्ष उन्मळून पडले असून शेतातील घरांवरील आणि गोठ्यांवरील टिनपत्रे उडून गेली आहेत. सायंकाळच्या वेळी आलेल्या या वादळामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची मोठी गैरसोय झाली. घरांवरील छप्परे उडाल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गोठ्यांवरील टिनपत्रेही उडून गेल्याने सकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. गोरेगाव येथील मनोहर पांचाळ यांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने ते जखमी झाले. रात्रीची वेळ असल्याने नुकसानग्रस्तांना सामान सावरण्यास अडचणींचा सामना करावा लागला. तर सत्यनारायण अग्रवाल यांच्या शेतातील सर्वच टिनपत्रे उडून गेली असून अनेक पत्रे बेपत्ता झाली आहेत. त्यांच्या शेतातील चार वीजखांबही कोसळले आहेत.
पिंपळगाव सोनारा, शिंदी आणि मोहाडी या गावांमध्येही अनेक ठिकाणी वीजखांब कोसळले असून वृक्ष उन्मळून पडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. साखरखेर्डा गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये सकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी धावपळ करावी लागली. कंत्राटदारांनी वीज यंत्रणेची कामे दर्जेदार पद्धतीने न केल्यामुळे साखरखेर्डा ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत वारंवार समस्या निर्माण होत असल्याचा आरोप महावितरण कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे रात्रभर अंधारात फॉल्ट शोधण्याचे काम करावे लागले. दरम्यान, काही भागांत पावसानेही हजेरी लावली.