– मटणाची भाजी सांडल्याच्या क्षुल्लक कारणावरून हल्ला; अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल
चिखली (अंकुश पाटील) : शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेंढ्यांचा मुक्काम शेतात घालण्यासाठी आलेल्या एका ५८ वर्षीय अपंग मेंढपाळावर क्षुल्लक कारणावरून निर्दयीपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना इसरूळ शिवारात घडली आहे. मटणाची भाजी सांडल्याच्या कारणावरून आरोपीने लाकडी काठीने जबर मारहाण केली असून, या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव रामराव काळे (वय ५८, रा. इसरूळ, ता. चिखली) असे जखमी अपंग मेंढपाळाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनोद रामदास खांबट (रा. इसरूळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ जून रोजी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास इसरूळ शिवारातील शेख मन्नू शेख दादू यांच्या शेतात घडली. संबंधित शेतात मेंढ्यांचा मुक्काम सुरू असताना रात्रीच्या जेवणासाठी मटणाची भाजी तयार केली जात होती. अचानक भाजी सांडल्याच्या कारणावरून आरोपी विनोद खांबट याने जुन्या वादाचा राग मनात धरला. आरोपीने फिर्यादी भीमराव काळे यांना लाकडी काठीने मान, पाठ आणि दोन्ही पायांवर बेदम मारहाण केली. मारहाण करतानाच आरोपीने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भीमराव काळे यांनी दुसऱ्याच दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी रेफर केले. त्यानुसार त्यांनी बुलढाणा येथे उपचार घेतले. उपचार पूर्ण झाल्यानंतर, ११ जून रोजी सायंकाळी त्यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात हजर राहून रीतसर तक्रार नोंदवली. मेंढपाळ हे शेतकऱ्यांच्या शेतात रात्रभर मेंढ्यांचा मुक्काम ठेवून जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त असे नैसर्गिक खत पुरवतात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मोठी मदत होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आणि जमिनीसाठी कष्ट उपसणाऱ्या एका अपंग मेंढपाळावर केवळ क्षुल्लक कारणावरून झालेला हा जीवघेणा हल्ला मानवतेला काळिमा फासणारा असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. परिसरात गुन्हेगारांवर कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश देढे करीत आहेत.