-माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोष
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज पार पडली. यामध्ये सभापतीपदी उमेश शेजूळ तर उपसभापतीपदी राहुल काबरा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा निश्चित करण्यात आला होता. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर विद्यमान सभापती अनिल तुपकर यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे राजीनामा सादर केला. तसेच भाजपचे विष्णू मेहेत्रे यांनीही उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या या पदांसाठी निवडणूक घेण्याचे आदेश उपनिबंधक शितोळे मॅडम यांनी दिले होते. त्यानुसार ९ जून रोजी निवड प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी उमेश शेजूळ आणि उपसभापतीपदासाठी राहुल काबरा यांची नावे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश काळे यांनी जाहीर केली.
या निर्णयाचे सर्व संचालकांनी स्वागत केले. कोणताही अन्य अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शितोळे मॅडम यांनी दुपारी दोन वाजता उमेश शेजूळ आणि राहुल काबरा यांची अनुक्रमे सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या घोषित केले. यावेळी मावळते सभापती अनिल तुपकर, मावळते उपसभापती विष्णू मेहेत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे, नगराध्यक्ष तायडे तसेच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे पदाधिकारी, संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती उमेश शेजूळ आणि उपसभापती राहुल काबरा यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, बाजार समितीच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.