-उत्तम नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन; महाप्रसाद व विविध सुविधांची व्यवस्था
शेवगाव (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्ट्या आणि अधिक मासातील विशेष मंगळवाराच्या निमित्ताने श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “आई राजा उदो उदो”च्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला सुरळीत व सुलभ दर्शन मिळावे यासाठी देवस्थान प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले होते. पार्किंग व्यवस्था, दर्शन रांगा, जागोजागी पिण्याच्या पाण्याची सुविधा, दर्शन रांगांमध्ये सर्क्युलेटिंग फॅन तसेच सावलीची व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप आणि विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दीच्या दिवशी भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
नवसाला पावणारी जगदंबा माता म्हणून श्री मोहटादेवी गडाची ख्याती असून, दर्शनासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेने राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे येत आहेत. भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जगदंब ट्रस्टच्या वतीने विविध विकासकामे आणि सुविधा योजना राबविण्यात येत आहेत. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आणि जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे यांनी गडावर आलेल्या भाविकांचे स्वागत करून विविध व्यवस्थेची पाहणी केली.