-२५ लिटर गावठी दारू व ७०० लिटर मोह सडवा नष्ट; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
चिखली (महेंद्र हिवाळे) : रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मातला शिवारात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक कारवाई करत २५ लिटर गावठी दारू आणि ७०० लिटर मोह सडवा जप्त केला. जप्त करण्यात आलेला संपूर्ण साठा पोलिसांनी पंचांसमक्ष जागेवरच नष्ट केला असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मातला शिवारातील नाल्याकाठी मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोळंके यांना प्राप्त झाली होती. माहितीच्या आधारे त्यांनी बिट अंमलदार आशिष काकडे, पोलीस अंमलदार राहुल जाधव आणि दशरथ जवादे यांच्यासह घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी परिसराची झडती घेतली असता प्लास्टिकच्या ड्रममध्ये साठवून ठेवलेला ७०० लिटर मोह सडवा तसेच कॅनमध्ये भरून ठेवलेली २५ लिटर तयार गावठी दारू आढळून आली.
ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसमक्ष मोह सडवा नाल्यात ओतून नष्ट केला तसेच ड्रम फोडून अवैध दारू निर्मितीचे साहित्यही नष्ट केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३८ हजार ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील अवैध धंद्यांविरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.