-हरिनाम, कीर्तन, भजन आणि महाप्रसादाची धार्मिक पर्वणी; भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टच्या वतीने अधिकमासानिमित्त भव्य-दिव्य त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली.
या धार्मिक आणि मंगलमय अधिकमास पर्वणीत दररोज सकाळी काकडा, भजन, दुपारी महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, तर रात्री हरिकीर्तन सेवा व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच रात्री १० ते १२ या वेळेत जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहास गुरुवार, दि. ११ जून रोजी प्रारंभ होणार असून रविवार, दि. १४ जून रोजी हरिनाम गजरात सांगता होणार आहे. या धार्मिक पर्वणीचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट, थोरल्या पादुका तरुण भजनी मंडळ आणि स्वकाम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हरिकीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये पहिल्या दिवशी भागवत महाराज कचरे, दुसऱ्या दिवशी मल्लेश महाराज चिंतले आणि तिसऱ्या दिवशी सोपान महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा होईल. तसेच रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महेंद्र महाराज नलावडे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर हरिनाम गजर, महाप्रसाद आणि सांगता सोहळा पार पडणार आहे. अधिकमासाच्या पुण्यपर्व काळात आयोजित या धार्मिक पर्वणीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे.