-जयस्तंभ चौकात आंदोलन; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत स्थानिक जयस्तंभ चौक येथे रविवारी (८ जून) शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार म्हणाले की, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. या योजनेमध्ये विविध नियम, अटी व शर्ती लावून जवळपास ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपा-महायुती सरकारची ही कर्जमाफी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या व थकीत असलेल्या कर्जांपुरती मर्यादित आहे. अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी घेतलेली कर्जे थकीत असल्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे सर्व थकीत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ थकीत शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, फडणवीस सरकारची ही योजना केवळ पीककर्ज आणि पुनर्गठित कर्जापुरती मर्यादित आहे. अनेक शेतकऱ्यांनी विहीर, पाईपलाईन, गाई-म्हशी यांसाठी घेतलेली कर्जेही थकीत आहेत. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने ते वंचित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ जयस्तंभ चौक येथे शासन निर्णयाची होळी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रकाश पाटील अवचार यांनी दिला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते, काँग्रेस नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर, नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, विरोधी पक्षनेते डॉ. ईसरार जमादार, दत्ताभाऊ काकस, प्रमोद पाटील, अॅड. भाऊराव भालेराव, कलीम खान, प्रदीप देशमुख, अश्रू फुके, स्वप्नील ठाकरे, अजय तायडे, किशोर भोसले, बबलू पठाण, वैभव इंगळे, विश्वदीप पडोळ, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष तुषार खरे, अविनाश उमरकर, सतीश टाकळकर, कैलास देशमुख, गजनफर खान, सुनील तायडे, नीना इंगळे, ज्ञानेश्वर शेजोळे, गणेशराव पाटील, तुळशीराम नाईक, अमर पाचपोर, बाबू जमादार, मोहतेश्याम रजा, मुजमील खान, नासीर खान, सय्यद जुनेद, मीनाताई सातव, शेरूभाई, इरफान पठाण, समाधान दामधर, सय्यद आसीफ, अजहर देशमुख, शिवाजी क्षीरसागर, अनिल सावळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.