-शेतकरी,शेतमजूरांच्या समस्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार – संतोष खरात
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : किसान काँग्रेसच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील पेनटाकळी येथील काँग्रेस कार्यकर्ते संतोष प्रल्हाद खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका नवनियुक्त तालुकाध्यक्ष संतोष खरात यांनी व्यक्त केली.
पेनटाकळी येथील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते संतोष प्रल्हाद खरात यांची मेहकर तालुका किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी ५ जून रोजी पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्रात काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून शेतकरी व शेतमजुरांच्या हितासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखपालसिंग खैरा, राष्ट्रीय महासचिव खासदार मुकुल वासनिक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार तसेच इतर नेत्यांचे हात बळकट करून पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना संतोष खरात म्हणाले की, शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रश्नांसाठी आपण सातत्याने लढा देणार असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाही. आपल्या नियुक्तीचे श्रेय त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिले असून त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.