– आमदार मनोज कायंदे यांच्या प्रतिनिधींचे लेखी आश्वासन; आंदोलन यशस्वी
– शिवसेना नेते नरेंद्र खेडेकरांसह विविध पक्षांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा
चिखली (अंकुश पाटील): गेल्या पाच महिन्यांपासून खड्ड्यांच्या साम्राज्यात अडकलेल्या आणि प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरलेल्या रोहडा–अंत्री खेडेकर रस्त्याच्या प्रश्नावर अखेर ग्रामस्थांच्या तीव्र जनआक्रोशापुढे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना झुकावे लागले आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सोमवारपासून चिखली तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि उद्यापासूनच रस्त्याचे काम सुरू करण्याच्या ठाम आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे यांनी उद्याच कामाची यंत्रसामग्री जागेवर पोहचेल, असे जाहीर केल्याने ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला.
रोहडा ते अंत्री खेडेकर या सुमारे ४ किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, आगामी पावसाळ्यात नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागणार होती. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामस्थ आणि शेतकरी शांततेच्या मार्गाने निवेदने देऊन रडत-खडत मागणी करत होते, मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. शेवटी हताश झालेल्या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सोमवारपासून तहसीलवर धडक देत उपोषणाचे अस्त्र उपसले.
ग्रामस्थांचे हे आंदोलन सुरू होताच संपूर्ण तालुक्यातून याला मोठा पाठिंबा मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते नरेंद्र खेडेकर, कपिल खेडेकर, बाजार समितीचे माजी उपसभापती राम खेडेकर, शेतकरी नेते विनायक सरनाईक, आरपीआयचे विदर्भाध्यक्ष संजय वाकोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) गजानन वायाळ आणि शिवसेना नेते संतोष भुतेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा तीव्र निषेध केला. तसेच, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, केंद्रीय मंत्री खा. प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक नीरज काकडे आणि चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनीही प्रशासकीय लवाजम्यासह उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
…आणि अखेर उद्यापासून काम सुरू होणार!
आंदोलनाचा वाढता जोर पाहून सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे यांनी तात्काळ मध्यस्थी केली. “उद्या सकाळपासूनच रस्त्याच्या कामासाठी लागणारी अवजड यंत्रसामग्री (जेसीबी, पोकलॅन) जागेवर दाखल होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व सुभाष दराडे यांच्या हस्ते आंदोलकांना थंड पेय देऊन हे उपोषण दुपारी ४ वाजता सोडवण्यात आले.
काम कायमस्वरूपी दर्जेदार करा, अन्यथा पुन्हा गाठ आमच्याशी! “सध्या जरी तात्पुरते काम सुरू होत असले, तरी भविष्यात हा रस्ता कोणत्या योजनेतून कायमस्वरूपी आणि दर्जेदार करता येईल, यासाठी शासन स्तरावर मोठा पाठपुरावा केला जाईल,” असे आश्वासन आमदार कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि आ. श्वेताताई महाले यांनी दिले आहे. मात्र, प्रशासनाने यात चालढकल केल्यास पुन्हा तीव्र संघर्ष छेडला जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
या यशस्वी आंदोलनात राहुल टाकळकर, संजय खेडेकर, सागर खरात, समाधान पेंढारकर, अमोल मोरे, मधुकर शेळके, प्रमोद मोरे, दगडू खेडेकर, उत्तम माळेकर, शिवाजीराव खेडेकर, विनायक खेडेकर, अजाबराव खेडेकर आणि भिकाजी खेडेकर आदी उपोषणकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांना पाठिंबा देण्यासाठी रमेश खेडेकर, बाळू पाटील, मिलिंद खेडेकर, पंजाब खेडेकर, वसंतराव खेडेकर, हरिभाऊ खेडेकर, नारायण चितराळे, राजेंद्र बुरकुल, दीपक कळंगे, मोहम्मद शोएब, मोहम्मद आसिफ, राहुल लवाळे, एकनाथ खेडेकर, दिलीप मोरे, अमोल खेडेकर, शोभा खरात, भीमराव तळेकर, इंदूबाई तळेकर, सुशीला खरात, अण्णा माळेकर, संजय खरात, रघुनाथ लवाळे, केशवराव सोरमारे, गणेश बुरकुल, परमेश्वर मोरे, रामदास खेडेकर, दीपक खरात, प्रवीण देशमुख, पुंजाजी लवाळे, शिवाजी तळेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे, चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात होता. मात्र, जनतेच्या एकजुटीपुढे शेवटी यंत्रणेला नमते घ्यावेच लागले.