– ५ वर्षात ५२ अपघात, २८ मृत्यू; चिखली-केळवद पट्ट्यातील रक्ताच्या थारोळ्यावर युवासेना आक्रमक!
– जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन; अपघातांचे सत्र रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी
चिखली (अंकुश पाटील): वाढती लोकसंख्या, वाहनांची प्रचंड वर्दळ आणि त्यामुळे वाढलेले जीवघेणे अपघात लक्षात घेता, चिखली-बुलढाणा-मलकापूर हा ७१ किलोमीटर लांबीचा मार्ग तात्काळ राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करून नवीन व सुरक्षित रस्त्याची निर्मिती करावी, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सन २००६ मध्ये सुमारे ३८.७६ कोटी रुपयांच्या खर्चाचा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बुलढाणा अर्बन सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आला होता. २००८ मध्ये या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, या कराराचा कालावधी २०३४ पर्यंत आहे. मात्र, बदलत्या काळात वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून हा मार्ग आता अत्यंत अपुरा आणि धोकादायक ठरत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.
या रस्त्यावरील अपघातांची आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. २०२१ ते २०२६ या अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत केवळ चिखली ते केळवद या १० किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल ५२ भीषण अपघात झाले आहेत. यामध्ये ३८ जण गंभीर जखमी झाले असून २८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण ७१ किलोमीटर मार्गावर गेल्या काही वर्षांत झालेल्या सर्व अपघातांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवावी. टोल व्यवस्थेचे योग्य समायोजन करून तसेच संबंधित कंपनीची शिल्लक रक्कम शासनाने अदा करून हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यासाठी शासन स्तरावर युद्धपातळीवर पाठपुरावा करावा, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
…तर तीव्र आंदोलन छेडणार! > “या संवेदनशील आणि जनहिताच्या मागणीची प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर शिवसेना व युवासेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असेल,” असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांनी दिला आहे.
या निवेदनावर युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्यासह श्रीरामभाऊ झोरे, विलासभाऊ सुरडकर, किसनराव घाडगे, प्रीतमभय्या गैची, शिवाजीराव पवार, नारायणभाऊ वाणी, सखाराम पाटील, अशोक राजपूत, हरिभाऊ इंगळे, आनंदभय्या गैची, समाधान जाधव, रवी पेटकर, शंभू गाडेकर, अनिल जावरे, अण्णाभाऊ देवकर, बंडूभाऊ सरसे, शुभम वानखेडे, पुंजाजी शेळके, प्रदीपभाऊ वाघ, वसंता अंभोरे, मोरे सुनील रगड, विष्णू मुरकुटे, राहुल वरवंडे, कृष्णा कदम, प्रकाश शेळके, कौतिकराव जाधव, राजूभाऊ मिसाळ, गजानन कुटे, गजानन साखरे, किशोर डहाळे, मदनराजे आकाळ, बंटी कपूर, हनुमान मुळे, शेख सोहेल, अशोकराव भोसले, मारुतीभाऊ गुजर, मनोहरभाऊ शिंदे, विशाल देशमुख, डीगांबर बंगाळे, बंडू गार्डे, दीपक जाधव, प्रल्हादभाऊ कराडे, विजय जाधव, गजानन फोलाने, प्रदीप इंगळे, विलास ठेंग, गजानन वायाळ, कैलास इंगळे, लक्ष्मण इंगळे, कृष्णा फोलाने, संतोष देशमुख, संतोष सोलट, सतनामसिंग वधवा, सूपडोजी कोराळे, चांगदेवभाऊ पवार, विठ्ठलभाऊ ठेंग, समाधान गायकवाड, कैलासभाऊ गायकवाड, ज्ञानेश्वरभाऊ गायकवाड आणि डॉक्टर काळे आदींसह असंख्य शिवसैनिक व युवासैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.