-खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे ) : देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये भरोसा-देऊळगाव घुबे परिसरातील ११ पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसाठी खडकपूर्णा प्रकल्पाच्या वतीने व महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या समन्वयाने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ पाटील थुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते शेनफडराव घुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजीनगर येथील वाल्मी संस्थेचे समन्वयक व जलसिंचन विषयाचे तज्ज्ञ डॉ. रेणुकादास भारसवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्पाचे समन्वयक निळकंठावार यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
बुलढाणा जिल्ह्याच्या हरित क्रांतीचे जनक व जलपुरुष स्वर्गीय भारतभाऊ बोंद्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे खडकपूर्णा प्रकल्पाचे मुख्य समन्वयक पी. बी. कोटेचा अँड कंपनी, पुणे यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू दत्ता शेजूळ यांनी प्रास्ताविकातून विषद केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्याने गठित झालेल्या पाणी वापर संस्थांच्या नवनियुक्त अध्यक्षांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्याची शोध व प्रशिक्षण संस्था (वाल्मी) चे माजी संचालक व महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे कायदेशीर सल्लागार डॉ. रेणुकादास भारसवाडकर यांनी २००५ च्या जलसिंचन कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, २००५ च्या कायद्याची निर्मिती करताना मी स्वतः त्या समितीचा मुख्य सल्लागार होतो. अनेक कृषी तज्ज्ञ, जलतज्ज्ञ आणि संशोधक यांच्या अभ्यासातून तसेच शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून या कायद्याची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी सहकार खात्याअंतर्गत पाणी वापर संस्थांचे व्यवस्थापन केले जात होते. मात्र, सहकार चळवळीची पडझड आणि त्यातील भ्रष्टाचारामुळे पाणी वापर संस्थांच्या कारभारालाही भ्रष्टाचाराची कीड लागली. त्यामुळे ही योजना कोलमडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर शेतकरी हा या चळवळीचा मुख्य घटक मानून सर्व हक्क व अधिकार २००५ च्या नवीन जलव्यवस्थापन व सिंचन कायद्याद्वारे शेतकऱ्यांनाच देण्यात आले. सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकरीच प्रकल्पाच्या पाण्याचे मालक असतील, हे या कायद्याचे मुख्य सूत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मालक म्हणून पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन पाणी वापर संस्था स्थापन करून, कायद्याच्या चौकटीत राहून करायचे आहे. शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचेल याची काळजी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या समन्वयाने घेऊन पाणीपट्टीची वसुली करणे आणि ती शासनाकडे जमा करणे ही संस्थांची जबाबदारी आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करून परिसराचा विकास साधायचा आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पाणी वापर संस्था कमी पडल्यास प्रकल्पाचे पाणी दुसऱ्या एखाद्या खाजगी एजन्सीकडे देण्याचा अधिकार शासनाने राखून ठेवला आहे. त्यामुळे असे होऊ द्यायचे नसेल, तर पाणी वापर संस्थांनी मजबूत राहून सक्षमतेने कारभार चालवावा, यातच सर्वांचे हित आहे.
पाणी वापर संस्थांच्या अधिकारांबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सिंचन हंगाम सुरू होण्यापूर्वी लाभधारक शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज भरून घेणे, प्रकल्प अधिकाऱ्यांकडे ते सादर करणे, पाण्याचे रोटेशन ठरविणे आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचविणे ही संस्थांची जबाबदारी आहे. कालव्यांची दुरुस्ती सुचविणे, पाणीपट्टीची वसुली करून त्याची नोंद ठेवणे आणि नियमित शासनाकडे भरणा करणेही महत्त्वाचे आहे. एखादा लाभधारक शेतकरी पाणी वापरूनही पाणीपट्टी भरत नसेल, तर त्याचे पाणी बंद करणे, सातबाऱ्यावर बोजा चढविणे किंवा कायदेशीर कारवाई करणे असे व्यापक अधिकार पाणी वापर संस्थांना आहेत. लाभक्षेत्रातील कोणताही शेतकरी पाणी वापर संस्थेच्या परवानगीशिवाय कालवा, नदी, नाला किंवा स्वतःच्या विहिरीतील पाणी सिंचनासाठी वापरू शकत नाही. तसे केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद या कायद्यात असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख उपस्थित शेनफडराव घुबे यांनी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना सांगितले की, पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रामाणिकपणे पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. स्वर्गीय भारतभाऊ बोंद्रे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी त्यांच्या सिंचनाच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे भावनिक आवाहन केले. कोणत्याही संस्थेची अडचण असल्यास परस्पर सहकार्याने त्यावर मार्ग काढण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
अध्यक्षीय समारोप करताना एकनाथ पाटील थुट्टे यांनी पाणी वापर संस्था हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करून प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर टीका केली. अधिकाऱ्यांनी पाणी वापर संस्थांना विश्वासात घेऊन सहकार्य केल्यास निर्धारित सिंचन क्षमतेपेक्षा अधिक सिंचन करणे शक्य असल्याचे त्यांनी इस्रायलच्या शेतीचे उदाहरण देत सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी समन्वयक निळकंठावार यांनीही आपले विचार मांडत शेतकऱ्यांनी सहकार्याच्या भावनेतून स्वतःचा आणि परिसराचा विकास साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी अमोल सरोदे यांनी केले.
या प्रशिक्षण शिबिरात भरोसा येथील जय सेवालाल पाणी वापर संस्था, जिजामाता पाणी वापर संस्था, बळीराजा पाणी वापर संस्था, छत्रपती शिवाजी महाराज पाणी वापर संस्था, कोनड-येवता-देऊळगाव धनगर येथील खंडोबा पाणी वापर संस्था, वसुंधरा पाणी वापर संस्था, पिंपळवाडी येथील जयमल्हार पाणी वापर संस्था तसेच येवता, मलगी, कोलारा आणि अमोना येथील पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खंडोबा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव घुबे, सचिव गणेश घुबे, अंबादास बाबा, गणेश प्रकाश घुबे, सुधीर घुबे, बंडू चेके, सुधाकर सरोदे आणि शंकर गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी खंडोबा पाणी वापर संस्था व वसुंधरा पाणी वापर संस्थेच्या कार्यालयात तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. रेणुकादास भारसवाडकर व निळकंठावार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.