– संभाजी ब्रिगेडनेही दिले चोख प्रत्युत्तर : तुमच्या जातीयवादी आणि मनुवादी विचारांचा बाजार उठविणार – संभाजी ब्रिगेड
– हिंदुत्ववादी शिवसेनेला मिळाली, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेची राजकीय ताकद
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या विशेष करून देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिवसेना फोडा व राज्य करा या नीतीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग हाती घेतला आहे. शिवसेनेसारख्या जहाल हिंदुत्ववादी संघटनेसोबत तितक्याच कट्टर बहुजनवादी संभाजी ब्रिगेड या संघटनेला ठाकरे यांनी सोबत घेतले आहे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आता फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेची ताकद मिळाली आहे. त्यामुळे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर जोरदार टीका करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण समाजातून आलेले नेते आहेत, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता संभाजी ब्रिगेडच आक्रमकपणे मैदानात उतरली आहे. तसेच, पुरोगामी संघटनाही आता भाजपच्या विरोधात मैदानात आल्याने राज्यात सामाजिक ध्रुवीकरण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
‘विनाशकाले विपरितबुद्धी’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर शिवसेनेला लगावला होता. याचा समाचार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्यासाठी एका विचाराने काम करीत आहेत. हे राज्यातील जनतेला माहीत आहे, असे सांगून, २३ पक्ष घेऊन तुम्ही भारतात सरकार बनवले आणि १ मताने पडले. त्याचबरोबर मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार बनवले, त्यावेळेस तुमची बुद्धी कुठे गेली होती? असा सवाल सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तसेच, फडणवीस यांच्या टिकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
दुसरीकडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या युतीबाबत बोलताना हा उद्धव ठाकरेंचा फुसका बार असल्याचे म्हटले होते. २०१९मध्ये संभाजी ब्रिगेडची युती शिवसेनेसोबत होती. संभाजी ब्रिगेड तेव्हा ४० जागांवर लढले. पण त्यांना ३६ हजाराच्या वर मते मिळवता आली नाहीत. ०.०६ टक्के मते त्यांना मिळाली. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसका बार सोडला आहे, असा टोला बावनकुळेंनी लगावला होता. यावरून संभाजी ब्रिगेडने संतप्त प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनाच उलट खोचक शब्दांत सल्ला दिला आहे. ‘बावनकुळे साहेब, का तुम्हाला पोटशूळ उठला आहे? तुम्हाला संभाजी ब्रिगेडची भिती का वाटतेय? एकाच दिवसात तुम्ही एवढं टेन्शन घेतलंय. झंडूबाम घेऊन ठेवा. कारण तुमच्या डोक्याला संभाजी ब्रिगेडचा आणि शिवसेनेशी युतीचा त्रास होणार आहे. लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरून भांडू, तेव्हा तुमच्या जातीयवादी आणि मनूवादी विचारांचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी बावनकुळेंना टोला लगावला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर पक्षातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून पुन्हा नव्याने पक्षबांधणी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडून राज्यभरात नव्या पदाधिकार्यांची नियुक्ती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुत्तäया नुकत्याच जाहीर केल्या.