-कमी दाब आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण; समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : चापडगाव वीज केंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या शिंगोरी, राणेगाव, अंतरवाली खुर्द, अंतरवाली बुद्रुक, बेलगाव आदी गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असून वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर सुरू असलेला वीजेचा लपंडाव आणि रात्री अपरात्री खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावांमध्ये अनेकदा तासन्तास वीज गायब राहत असल्याने घरगुती कामांबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असताना कमी दाबामुळे पाणीपुरवठा योजना सुरळीत चालत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. अनेक ठिकाणी मोटारी सुरू होत नसल्याने नागरिकांना पाणी भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कमी दाबाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. कृषीपंप व्यवस्थित सुरू होत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. काही वेळा अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोटारी जळण्याचाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही या परिस्थितीचा परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी अचानक वीज गायब होत असल्याने परीक्षेच्या तयारीत अडथळे निर्माण होत आहेत. उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे हाल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, रात्री अपरात्री वीजपुरवठा बंद होत असल्याने गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे चोरी अथवा अन्य अनुचित प्रकार घडण्याची भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत. “रात्री वीज गेल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण होते. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दखल घेत नाहीत,” अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या समस्येबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने व तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तात्पुरत्या दुरुस्तीवर वेळ मारून नेली जात असून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. चापडगाव केंद्रातील तांत्रिक बिघाड त्वरित दूर करून नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करावा, कमी दाबाची समस्या कायमस्वरूपी सोडवावी तसेच वारंवार होणारे खंडित पुरवठे थांबवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा लवकरच रास्ता रोको, ठिय्या आंदोलन व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.