-मेरा बुद्रुक शिवारात अवैध लाकूडसाठ्यावर वन विभागाचा छापा; निम व इतर प्रजातींचे लाकूड जप्त
देऊळगाव घुबे (अंकुश पाटील) : आज दिनांक २८/०५/२०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे वन विभागाने चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक शिवारात धडक कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेला निम व इतर अडजात प्रजातींच्या लाकडाचा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माननीय उपवनसंरक्षक बुलढाणा वन विभाग बुलढाणा जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वन विभागाला मेरा बुद्रुक शिवारात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना लाकूड साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर अंचरवाडी बीटचे वनरक्षक गजानन माणिकराव पोटे यांनी घटनास्थळी भेट देत तपासणी केली. तपासणीदरम्यान मौजे मेरा बुद्रुक येथील गट क्रमांक ५१७ मध्ये शेतकरी संजय खरात रा. शिंदी यांच्या पडीत जमिनीत मोठ्या प्रमाणावर निम व इतर प्रजातींचे लाकूड साठवून ठेवलेले आढळून आले. हा साठा आरामशीन मालक नरेंद्र पाटील रा. साखरखेर्डा यांनी कोणतीही वन परवानगी अथवा पास न घेता दडवून ठेवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
वन विभागाने तत्काळ कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सदर कारवाई वनरक्षक गजानन माणिकराव पोटे, अंचरवाडी बिटचे वनसेवक ऋषिकेश तुपकर यांनी पार पाडली. या कारवाईसाठी सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कँपा बुलढाणा वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा सुनील वाकोडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल प्रदीप प्रकाश मुंढे करीत आहेत.
