-महिनोन्महिने रखडले नोंदणी व नूतनीकरण अर्ज
चिखली (अंकुश पाटील): बुलढाणा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी, नूतनीकरण आणि विविध लाभांचे अर्ज महिनोन्महिने प्रलंबित असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांना निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
जिल्हाध्यक्ष सागर नारायण झगरे यांच्या नेतृत्वाखाली २७ मे २०२६ रोजी कामगार अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात जानेवारी महिन्यापासून कामगारांचे अर्ज प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चिखली तालुक्यात जवळपास वर्षभरापासून नूतनीकरण प्रक्रिया ठप्प असल्याचा आरोप करण्यात आला असून संगणक प्रणाली काही दिवसच सुरू राहत असल्याने कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी तब्बल सहा महिन्यांनंतर तारीख मिळत असल्याने कामगारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नोंदणीवरील मोबाईल क्रमांक बंद झाल्यास तो बदलण्यासाठी १५ ते २० दिवस लागत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
मेहकर आणि सिंदखेडराजा तालुक्यात ग्रामसेवकांकडून ९० दिवसांचे प्रमाणपत्र वेळेत दिले जात नसल्याने नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया रखडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ठेकेदारांचे दाखले सादर केल्यास अर्ज नामंजूर केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरही किरकोळ त्रुटी दाखवून अर्ज नामंजूर केले जात असल्याने कामगारांना पुन्हा ऑनलाइन प्रक्रिया करून अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. वेळेवर लाभ न मिळाल्याने कामगार आर्थिक संकटात सापडले असून सर्व प्रक्रिया सुलभ करून कोणताही कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना बांधकाम कामगार सेनेने केली आहे. यावेळी विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या प्रश्नांची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सागर झगरे यांनी दिला.