-ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांची धानोरे शाळेच्या कार्याविषयी विशेष चर्चा
आळंदी (अर्जुन मेदनकर): ससून जनरल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांना भेटण्याचा योग नुकताच आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भारती हेही उपस्थित होते. उच्च पदावर कार्यरत असूनही अत्यंत साधेपणाने व सर्वसामान्यांशी आपुलकीने संवाद साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. जाधव यांनी उपस्थितांवर विशेष छाप पाडली.
अत्यंत व्यस्त दैनंदिन कामकाजातून वेळ काढत त्यांनी धानोरे शाळेच्या कार्याविषयी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कौशल्य विकास शिक्षणाचे महत्त्व त्यांनी समर्पक उदाहरणांसह स्पष्ट केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळांनी कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तावाढीसाठी आणि अद्ययावत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी आवर्जून जाणून घेतली. भेटीदरम्यान डॉ. जाधव यांनी लवकरच धानोरे शाळेला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यांच्या साधेपणाने, सकारात्मक दृष्टिकोनाने आणि शिक्षणाविषयीच्या तळमळीने ही भेट निश्चितच प्रेरणादायी ठरल्याची भावना आदर्श शाळा धानोरेचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी व्यक्त केली.