-वनसंवर्धन व पर्यावरण जनजागृती विषयांवर चर्चा
बुलढाणा (वाजिद खान) : उपवनसंरक्षक कार्यालय, बुलढाणा येथे नवनियुक्त मानद वन्यजीव रक्षकांचा स्वागत समारंभ महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला. उपवनसंरक्षक जमीर शेख, वन क्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे तसेच स्वप्नील पवार (खामगाव) यांच्या हस्ते मानद वन्यजीव रक्षक सचिन रामदास कापुरे (लोणार) आणि डॉ. वैशाली गजेंद्र निकम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वन्यजीव रक्षकांच्या कार्याची माहिती देण्यात आली तसेच बुलढाणा जिल्ह्यातील वने आणि अभयारण्यांच्या जतन व संरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. ज्ञानगंगा अभयारण्य बोथा, लोणार सरोवर, दुर्गा टेकडी, मढी जंगल (लोणार) तसेच अंबाबरवा अभयारण्य यांच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला. कार्यक्रमात वृक्षतोड रोखणे, पर्यावरण संवर्धन, अवैध जंगलतोड आणि जंगलातील बेकायदेशीर कृत्यांविरोधात जनजागृती करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच वनविभागाच्या विविध योजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास जैवविविधता तज्ञ आलोक शेवडे, निसर्ग फाउंडेशनचे सर्पमित्र विनय कुलकर्णी, वन्यजीव छायाचित्रकार डॉ. गजेंद्र निकम तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.