-डिव्हायडरवरील झाडेही तहानलेली; प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांचा सवाल
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना तब्बल १६ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका बाजूला नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसताना, दुसऱ्या बाजूला शहरातील मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडरवर लावलेली झाडेही पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच लहान मुलांना दूरवरून पाणी आणावे लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे स्वच्छतेच्या समस्या देखील दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. दरम्यान, शहर सुशोभीकरणासाठी मुख्य रस्त्यांच्या डिव्हायडरवर लावण्यात आलेली झाडेही पाण्याअभावी कोमेजलेली दिसत आहेत. अनेक ठिकाणी झाडांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने ती सुकण्याच्या अवस्थेत पोहोचली आहेत. विशेष म्हणजे या झाडांसाठी एका टँकर पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शासनाकडून वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र लागवडीनंतर झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधी मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असून या ज्वलंत प्रश्नावर मूग गिळून गप्प असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“शहरातील नागरिकांना १६ दिवसांनी पाणी देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, शहरातील झाडेही पाण्याअभावी मरत आहेत, हे दुर्दैवी आहे. पर्यावरण टिकवण्यासाठी लावलेली झाडे जपणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था किंवा टँकरची सोय तातडीने करण्यात यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी दिला आहे. शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.