-२१ ते २८ मे दरम्यान श्री पलसिद्ध महास्वामी मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात २१ मे ते २८ मे दरम्यान भव्य शिवपुराण कथा, पारायण आणि किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.
अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हटले जाते, हा परमार्थ आणि आत्मसाधनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात पूजा, अर्चना, जप, ध्यान, पारायण आणि दानधर्म यांना विशेष महत्त्व असते. या काळात केलेली साधना अनेक जन्मांचे पुण्य देणारी मानली जाते. “अधिक मास अधिकस्य अधिकम् फलम्” या उक्तीप्रमाणे या महिन्यातील सत्कर्म आणि भक्ती परमेश्वराची कृपा प्राप्त करून देणारी असल्याचे धार्मिक मान्यता आहे.
सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या “गुरुपुष्पामृत” सोहळ्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पहाटे संत शिवदासकृत शिवपाठाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर श्रींच्या समाधीस्थळी रुद्राभिषेक, परमरहस्य पारायण, व्याख्यान, शिवपुराण कथा आणि रात्री हरिभक्तीपर किर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. शिवपुराण कथा सादर करण्यासाठी प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री (आळंदी) यांची उपस्थिती लाभणार असून, सायंकाळी संत लक्ष्मण महाराजकृत शिवपाठ आणि रात्री किर्तन सोहळ्याने वातावरण भक्तिमय होणार आहे. दररोज महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे साखरखेर्डा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.