-मामासाहेब मोहोळ धर्मशाळेसमोर दुर्दैवी अपघात; मोटारसायकलचा तोल गेल्याने घटना
आळंदी, दि. १४ (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील मामासाहेब मोहोळ धर्मशाळेसमोर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ६३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोटारसायकलचा अचानक तोल गेल्याने महिला पाण्याच्या टँकरखाली आल्याची घटना घडली असून या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हरिपाठ उद्यानाजवळील गणपती मंदिर चौक परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. आन्नपूर्ण माणिकराव रोकडे (वय ६३, रा. विकासवाडी, धानोरे फाटा, ता. खेड, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलस्वाराचा अचानक तोल गेल्याने दुचाकी रस्त्यावर घसरली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरखाली महिला आल्याने टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आला असून अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात आळंदीत झालेल्या दोन अपघातांत एक महिला व एक पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती वाहतूक, प्रलंबित रस्ते विकासकामे आणि अपूर्ण फुटपाथ यामुळे पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.