-एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल पीएसआय शंकर दुबे यांचा सवडद गावात भव्य सत्कार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करत शहरांची वाट धरावी लागते. मात्र जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी केले. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएसआय पदावर निवड झालेल्या शंकर दुबे यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असून गावात केवळ सातवीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना साखरखेर्डा, खामगाव, बुलढाणा किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत राहून शंकर दुबे यांनी शिक्षण पूर्ण केले आणि प्रथम पोलीस विभागात भरती मिळवली. त्यानंतरही त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून पीएसआय पद मिळवले. १० मे रोजी सवडद गावात शंकर दुबे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिला आणि पुरुषांनी उत्स्फूर्त स्वागत करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी माजी सरपंच रुख्मिणा देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला दत्तात्रय दुबे, शहाजी देशमुख, गणेश देशमुख, राजू देशमुख, गजानन देशमुख, सतीश देशमुख, बबन मोरे, लक्ष्मण देशमुख, कैलास दुबे, संतोष देशमुख, विजय देशमुख, प्रगती देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.