-हुमणी अळी नियंत्रण, बीज प्रक्रिया आणि कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती
देऊळगाव घुबे(राजेंद्र घुबे) : तालुक्यातील मौजे मलगी येथे शुक्रवार, ८ मे रोजी खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध पिकांचे व्यवस्थापन, बियाणे प्रक्रिया, कीड नियंत्रण तसेच शासनाच्या कृषी योजनांची माहिती देण्यात आली.
सभेला मंडळ कृषी अधिकारी सोरटे साहेब, उपकृषी अधिकारी व्ही. एन. परीहार, सहाय्यक कृषी अधिकारी योगेश सरोदे तसेच कु. जी. डी. सवडतकर उपस्थित होते. या सभेचे आयोजन गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी सौ. ए. एस. खेडकर यांनी केले होते. यावेळी सौ. खेडकर यांनी महाडीबीटी पोर्टलअंतर्गत शेतकरी बचत गट व वैयक्तिक शेतकऱ्यांनी बियाणे उपलब्धतेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. तसेच बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, बीबीएफ पद्धतीने पेरणी आणि बीबीएफ यंत्रासाठी अर्ज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी योगेश सरोदे यांनी हुमणी अळी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर माहिती दिली. नितीन शिवनारायण भुसारी यांच्या शेतामध्ये लाईट ट्रॅपचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. पेरणीपूर्वी हुमणी अळी नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
उपकृषी अधिकारी व्ही. एन. परीहार यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत माहिती देत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या सभेला सरपंच प्रतिनिधी विनायक सिताराम साप्ते, बाजीराव पवार, संतोष पवार, मोतीसिंग पवार, भगवान शेळके, विनोद शेळके, शिवदास पवार, विष्णू पवार, बद्रीनाथ पवार, दिलीप शितोळे, अंकुश साप्ते, कैलास शेळके, विष्णू जाधव, नितीन भुसारी, शिवनारायण भुसारी, तुळशीराम भुसारी यांच्यासह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी ए. टी. सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सभा उत्साहात पार पडली.