-Beneficiary Satyapan App द्वारे ऑनलाईन प्रक्रिया अनिवार्य; जूनपासून लाभ बंद होण्याची शक्यता
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासन निर्णय क्रमांक केपुयो-2026/प्र.क्र.42/विसयो दिनांक ७ मे २०२६ नुसार Beneficiary Satyapan App या प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
विशेष सहाय्य योजनांतील पात्र लाभार्थी स्वतःकडे मोबाईल उपलब्ध असल्यास स्वतः ही प्रक्रिया करू शकतात. तसेच नातेवाईक, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक (कोतवाल), ग्रामपंचायत संगणक परिचालक, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातूनही हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करता येणार आहे. हयात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी लाभार्थ्यांना गुगल प्ले स्टोअरवरून Beneficiary Satyapan App तसेच Aadhar Face RD हे ॲप डाउनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक वापरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याचा आधार क्रमांक नमूद करून योजना निवडावी आणि फेस कॅप्चर किंवा बोटांचे ठसे या पर्यायांद्वारे हयात प्रमाणपत्र तयार करता येईल.
चिखली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना तहसीलदार विजय सवडे यांनी आवाहन केले आहे की, त्यांनी तात्काळ उपलब्ध माध्यमांद्वारे आपले हयात प्रमाणपत्र अद्यावत करून घ्यावे. कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास संबंधित तलाठी, कोतवाल किंवा तहसील कार्यालयातील संगायो शाखेशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार हयात प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे जून महिन्यापासूनचे अनुदान बंद करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.