Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitics

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी; संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेची युती!

– शिंदे गट, भाजपसमोरील राजकीय आव्हाने वाढली!


उद्धव ठाकरे-संभाजी ब्रिगेडची ‘वैचारिक नाळ’ एकच!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संभाजी ब्रिगेडची वैचारिक नाळ तशी एकच आहे. संभाजी ब्रिगेडची पितृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघावर उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा मानणारी संभाजी ब्रिगेड ही प्रबोधनकारांच्या विचारांनी प्रभावित आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांशी संभाजी ब्रिगेड व एकूणच मराठा सेवा संघ परिवारातील सर्व संघटनांची नाळ जुळलेली आहे. आज, शिवसेनेचे राजकीय अस्तित्व संपविण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले असताना, ठाकरे यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहण्याचा व त्यांना राजकीय, व सर्वच बाबतीत ताकद पुरवण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा सेवा संघाने घेतला आहे.


मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – बहुजन समाजातील जहाल संघटना संभाजी ब्रिगेडसोबत युती करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदेगटासह भारतीय जनता पक्षाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. मराठा सेवा संघ या राज्यातील सर्वात मोठ्या संघटनेचे जहाल अपत्य असलेल्या संभाजी ब्रिगेडशी युती केल्याने, राज्यातील राजकीय समिकरणे पालटणार असून, शिवसेनेसोबतच्या युतीने संभाजी ब्रिगेडचा आता महाविकास आघाडीत प्रवेश झाला आहे. या नव्या राजकीय समिकरणांमुळे शिंदे गट व भाजपसमोरील राजकीय आव्हाने मात्र वाढली आहेत. भाजप व शिंदे गटाला यापुढे राज्यात ‘चोख’ प्रत्युत्तर मिळणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आज झालेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, की शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे, असे सांगून, या लढवय्या सहकार्‍यांचे मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरु आहे. न्यायालयातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे असे मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले, की गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहित पाहिले. चांगले निर्णय घेतले. आता लोकशाही धोक्यात आलेली असताना छोटे पक्ष, संघटना वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागेल, यावर आमचे एकमत झाले. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

या लढवय्या सहकार्‍यांचं स्वागत करतोय. फक्त महाराष्ट्रातच नाही तर प्रादेशिक पक्ष चिरडून टाकणं यालाच लोकशाही मानणारे लोकं बेताल वागत आहेत. येत्या काही काळात सुप्रीम कोर्टात जो लढा सुरु आहे, हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचाच आहे असे नाही. देशात लोकशाही असेल का बेबंदशाही, याचा निकाल लागणार आहे. असो. पण आपण संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत. प्रादेशिक अस्मिता टिकावण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत. आपण सगळे शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आपण सगळे एकच आहोत. मराठी माणसाला दुहीचा शाप गाढत आलाय. या शापालाच आपण गाढून टाकूत. आज शिवसेना सत्तेत नसताना संभाजी ब्रिगेड आमच्यासोबत आले, याचा मोठा आनंद आहे. सत्तेत असताना तर कुणीही साथ देऊ शकतात, मात्र शिवसेना आज संघर्ष करत असताना सोबत आले ते खरे लढवय्ये, तेच खरं शौर्य, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

संभाजी ब्रिगेड कट्टर बहुजनवादी संघटना!

संभाजी ब्रिगेड विविध घटनांसाठी वारंवार चर्चेत राहिली आहे. त्यामध्ये २००४ मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला करणे असो किंवा दादोजी कोंडदेव हा राज्य शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार रद्द करण्याची मागणी असो, गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करणे असो, किंवा पुण्यातील संभाजी उद्यानाला राम गणेश गडकरी यांचे नाव बदलून संभाजी उद्यान करेपर्यंत केलेला संघष. अशा अनेक घटनांसाठी संभाजी ब्रिगेड या संघटनेला ओळखले जाते. पुण्यातील राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकामधून शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता, त्यामुळे गडकरी यांचा पुतळा या संघटनेने फोडून नदीत फेकला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या लिखाणावर संभाजी ब्रिगेडचा कायमच आक्षेप राहिला आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यावरूनही संभाजी ब्रिगेडकडून विरोध झाला होता. त्याबरोबर पुरंदरे यांच्यावरही शाईफेक करण्यात आली होती. पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या कांदंबरीवर विडंबन करणारी ‘पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर’ ही कादंबरी प्रसिद्ध विचारवंत आ. ह. साळुंखे यांनी लिहिली. त्या कादंबरीचा प्रसार आणि प्रचार संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!