हक्काचे पाटपाणी तर मिळालेच नाही; कनिष्ठ अभियंत्याने पाईपलाईनही तोडली!
– डोलखेडचे धरण शेतकर्यांसाठी ठरले सिंचनाचे वांझोटे स्वप्न!
– कनिष्ठ अभियंता राठोड म्हणतात, ‘पाणी घेसाल तर केसेस करेन’!
चिखली (एकनाथ माळेकर) – पाटबंधारे व जलसंपदा विभागातील संवेदनशून्यतेचा उत्तम नमुना चव्हाट्यावर आला असून, ज्या शेतकर्यांनी आपल्याला पाणी मिळेल, सिंचन वाढेल म्हणून आपल्या जमिनी धरणासाठी दिल्यात, त्याच धरणाचे पाणी तर सोडाच; परंतु पाईपलाईन टाकून पाणी घेतले तर कनिष्ठ अभियंत्याने आपल्या संवेदनशून्यतेचे प्रदर्शन घडवत, संबंधित शेतकर्यांचे पाईपच तोडून टाकले आहेत. परिणामी, या शेतकर्यांची पिके जळून चालली असून, शेतकरीवर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील डोलखेड लघु पाटबंधारे धरणाबाबतीत हा धक्कादायक तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. परिसरातील शेतकरी लवकरच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडेही आपली कैफियत मांडणार आहेत. ”एकतर पाटाचे हक्काचे पाणी द्या, नाही तर कनिष्ठ अभियंता जी. एस. राठोड यांना आवरा”, अशी भूमिका शेतकरी घेणार आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या टोकावर असलेल्या डोलखेड बुद्रूक येथे १९९२ मध्ये लघुपाटबंधारे प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळेस शेतकर्यांनी आपली चांगली शेती या धरणाच्या अधिग्रहणात दिली. अगदी अत्यल्प मोबदला मिळाला तरी तो आनंदाने घेतला. धरण झाले तर शेती ओलिताखाली येईल, अशी या शेतकर्यांची भाबडी आशा होती. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर शेजारी पाटाचीही निर्मिती करण्यात आली होती. परंतु आजपर्यंत एकाही शेतकर्याला या पाटाचे पाणी मिळाले नाही. हक्काचे पाटपाणी मिळत नसल्याने वैतागलेल्या धरणाशेजारील शेतकर्यांनी अखेर २०२१ पासून पाईपलाईन टाकून धरणातील पाणी आपल्या शेतीला घेण्यास सुरुवात केली. परंतु, कनिष्ठ अभियंता एस.जी.राठोड यांनी शेतकर्यांशी चर्चा न करता, शेतकर्यांची बाजू ऐकून न घेता, हे पाईप तोडून टाकले. त्यामुळे धरणाशेजारील शेतकर्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून, पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत. याबाबत कनिष्ठ अभियंता राठोड यांना शेतकर्यांनी आमचे पाईप का तोडले, हे विचारले असता, राठोड यांनी, सदर शेतकर्यांना केसेस करण्याची धमकी दिली आहे.
विशेष धक्कादायक बाब म्हणजे, या धरणाच्या पाटाचे पाणी पाटच नादुरुस्त असल्याने पुन्हा धरणात जात आहे. या धरणावरून तीस ते चाळीस शेतकर्यांनी पाईपलाईन केलेली आहे. ज्या शेतकर्यांनी या धरणावर पाईपलाईन केली, त्यांच्या शेतामधून पाट गेलेला आहे. शेतकर्यांच्या हक्काचे पाणी पाटाला सोडण्यात आले तर थेट धरणावर पाईपलाईन टाकण्याची गरज नाही, असे शेतकर्यांनी कनिष्ठ अभियंता राठोड यांना सांगितले. परंतु, राठोड यांनी शेतकर्यांचे ऐकून न घेता धरणावरील पाईप पोकलॅण्डच्या साह्याने तोडून शेतकर्यांचे मोठे नुकसान करत, आपली असंवेदनशील प्रवृत्ती दाखवली आहे. परिसरातील शेतकरी आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे अडचणीत असतानाच, हा वाईट प्रसंग राठोड यांनी या शेतकर्यांवर गुदरला. या अन्यायाविरोधात शेतकरीवर्ग तीव्र संताप व्यक्त करत असून, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व विरोधी पक्षनेत्यांकडे आपली कैफियत मांडणार आहेत.
”एक तर हक्काचे पाटपाणी द्या, नाही तर थेट धरणावर पाईपलाईन टाकू द्या”, अशी मागणी हे शेतकरी सरकारकडे करणार आहेत. तसेच, कनिष्ठ अभियंता राठोड यांनी पाईपलाईन तोडून जे नुकसान केले, त्याची भरपाई जलसंपदा किंवा पाटबंधारे विभागाने न देता, ती राठोड यांच्या पगारातून वसूल करून द्यावी, अशी मागणीही संबंधित संतप्त शेतकरी राज्य सरकारकडे लवकरच करणार आहेत. तसेच, याप्रश्नी एक जनहित याचिकाही दाखल करण्याबाबत शेतकरी नियोजन करत आहेत. दरम्यान, राठोड यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना १९९२पासून आजपर्यंत धरण भरले नसल्याची माहिती दिली आहे. जर आजपर्यंत धरणच भरले नाही तर मग धरणाशेजारील शेतकरी पाईपलाईन टाकून कुठले पाणी घेत होते? असा प्रश्न निर्माण होत आहे. कनिष्ठ अभियंता राठोड यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणीही शेतकरी करत आहेत.
या गंभीरप्रश्नी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने, डोलखेड धरणाचे कनिष्ठ अभियंता एस. जी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की धरणामध्ये तीन ते चार वर्षांपासून पाणी आलेले नाही. त्यामुळे पाट नादुरुस्त आहे. धरणामध्ये पाणी नसल्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये पाटाची दुरुस्ती केली जाईल.
डोलखेड बुद्रुक येथील शेतकरी विनायक राऊत यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, १९९२ पासून आमची एक गुंठासुद्धा जमीन या धरणाने ओलिताखाली आणली नाही. जर पाट सुरु झाला तर आमची शेतजमीन ओलिताखाली येईल. पाटपाणी मिळण्याच्या आशेने मंगरूळपर्यंत पाटचारी खोदून ठेवली गेली असून, शेकडो एकर शेती ओलिताखाली येऊ शकते. या भागात जलसिंचन वाढले तर शेतकर्यांचे शेतीउत्पन्नही वाढू शकते. परंतु, जलसंपदा व पाटबंधारे खाते या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष करत आहे. त्यातच कनिष्ठ अभियंता राठोड यांच्यासारखे संवेदनशून्य अधिकारी शेतकर्यांना न्याय देण्याऐवजी शेतकर्यांच्या मुळावर उठले आहेत. वस्तुस्थिती लक्षात न घेता, कायदा व नियमांचा धाक दाखवून राठोड यांच्यासारखे अधिकारी शेतकर्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप करत आहेत, असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला.