– स्वतःला जाळून घेतल्याने उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली; नेवासा परिसरात खळबळ!
ढोर जळगाव, ता. शेवगाव (प्रशांत खामकर) : नेवासा फाटा तसेच ढोरजळगाव येथील नामांकित त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे पाटील (वय ४२) यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. संस्थेच्या कार्यालयात स्वतःला पेटवून घेतल्याने ते गंभीररीत्या भाजले होते. या धक्कादायक घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, नेवासा व शेवगाव तालुक्यांत हळहळ व्यक्त होत आहे.
मनीष घाडगे पाटील हे संस्थेचे संस्थापक दिवंगत साहेबराव घाडगे पाटील यांचे पुतणे होते. मंगळवारी (दि. २८) दुपारी एकच्या सुमारास त्यांनी संस्थेच्या सचिव कार्यालयात स्वतःला आतून कोंडून घेतले आणि ज्वलनशील पदार्थाच्या साहाय्याने पेटवून घेतले. कार्यालयातून धूर बाहेर येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा घाडगे पाटील गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
एका मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही घटना केवळ आत्महत्या आहे की यामागे अन्य काही कारणे आहेत, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. घटनेच्या वेळी कार्यालयाचे दोन्ही दरवाजे आतून बंद होते, तरीही या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिक करत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आणि मित्रपरिवार आहे.