-१९९ रुपयांच्या कार्डासाठी २६०–३०० रुपये वसुली; प्रवाशांची फसवणूक
लोणार (वजीर खान) : एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेले स्मार्ट कार्ड आता प्रवाशांच्या लुबाडणुकीचे साधन ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. अधिकृत दर १९९ रुपये असताना अनेक एजन्सीधारकांकडून २६० ते ३०० रुपये वसूल केले जात असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एसटीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक तसेच विविध सवलतीधारक प्रवाशांना मोफत किंवा ५० टक्क्यांपर्यंत सवलती दिल्या जातात. या सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले असून जिल्हाभरात यासाठी एजन्सी व उप-एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. मात्र, शासनाने निश्चित केलेल्या १९९ रुपयांच्या दराला न जुमानता अनेक एजन्सीधारक जास्तीची रक्कम आकारत असल्याची तक्रार समोर येत आहे. विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर सवलतीधारकांकडून ६० ते १०० रुपये अधिक घेतले जात असून, जास्त पैसे न दिल्यास कार्ड देण्यास नकार दिला जात असल्याचेही नागरिक सांगत आहेत. अधिकृतरीत्या एजन्सीधारकांना प्रत्येक कार्डामागे १० रुपये आणि रिचार्ज व्यवहारासाठी ३ रुपये कमिशन दिले जात असतानाही ही अतिरिक्त वसुली सुरू असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याशिवाय “हा महिना शेवटचा आहे, कार्ड काढले नाही तर प्रवास करता येणार नाही” अशी भीती दाखवून अनेक एजन्सीधारक सवलतधारकांना तातडीने कार्ड काढण्यास भाग पाडत आहेत. प्रत्यक्षात हे कार्ड अनिवार्य करण्याबाबत एसटीकडून कोणतीही अधिकृत अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम व संताप वाढला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गैरप्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.