-स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा नोंद
वर्धा (प्रकाश कथले) : स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथकाने शहरात गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा जुगार चालवणाऱ्या बुकीवर धडक कारवाई करत सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी पूलफैल परिसरात राहणाऱ्या अविनाश मतेलकर याच्या घरावर छापा टाकला असता तो आपल्या साथीदारासह राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या लाईव्ह क्रिकेट सामन्यावर सट्टा लावताना आढळून आला. तो नागरिकांकडून पैसे घेऊन सामन्यावर हार-जीत लावून जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ५ हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल (किंमत सुमारे १ लाख ३५ हजार रुपये) तसेच इतर साहित्य असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अविनाश संजय मतेलकर (वय ३७, रा. सुदर्शन नगर, वर्धा) व संदीप जगजीत नैन (वय ३१, रा. सिंधी मेघे, वर्धा) यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.