-‘गोदा ते नर्मदा’ यात्रेंतर्गत पेनटाकळी प्रकल्पातील जलकलश यात्रेचा शुभारंभ
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपत जलसमृद्ध महाराष्ट्र घडवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी पाण्याचे योग्य आणि काटेकोर व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले.
स्थानिक जनसंवाद कार्यालयात शुक्रवार, २४ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी स्मृतीनिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा जल यात्रा २०२६’ अंतर्गत तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पातील जलकलश यात्रेचा शुभारंभ आमदार खरात यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. पैनगंगा नदीचा जलकलश कार्यकारी अभियंता शरद नागरे यांनी आमदारांच्या हस्ते स्वीकारला. २५ ते २९ एप्रिलदरम्यान चोंडी, त्र्यंबकेश्वर आणि महेश्वर या ठिकाणी गावोगावी जलसंवर्धनाचा संदेश देत जनजागृती केली जाणार आहे. कार्यक्रमाला संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.