-कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीमुळे कामे ठप्प
लोणार (वाजिद खान) : लोणार पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची कामे रखडत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या अनियमित हजेरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत समिती तसेच संबंधित सर्व विभागांमध्ये तातडीने बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
लोणार तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असल्याने नागरिक विविध शासकीय कामांसाठी दूरवरून पंचायत समितीत येतात. मात्र, अनेक वेळा संबंधित कर्मचारी अनुपस्थित असतात किंवा मॅन्युअल हजेरी नोंदवून इतरत्र गेल्याचे दिसून येते. परिणामी नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.तळोदा आणि साक्री पंचायत समित्यांमध्ये याच प्रकारच्या समस्येमुळे बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर लोणारमध्येही तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
बायोमेट्रिक प्रणालीचे फायदे
हजेरीत पारदर्शकता:
बायोमेट्रिक प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याची अचूक नोंद होऊन कामात शिस्त निर्माण होईल.
वेळेची बचत:
कर्मचारी वेळेवर उपलब्ध राहिल्यास नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत.
प्रशासकीय नियंत्रण:
विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठी सोपे होईल.
नागरिकांचा सवाल
राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली असतानाही लोणारमध्ये त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.