-जयंतीनिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा अभिनव उपक्रम; परिसरात कौतुकाची लाट
देऊळगाव कुंडपाळ (वाजिद खान) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे भारतीय घटनेचे शिल्पकार आणि तथागत गौतम बुद्ध यांच्यावरील निस्सीम भक्तीचे दर्शन घडवणारी घटना घडली. येथील सेवानिवृत्त शिक्षक उत्तम रामजी इंगळे (वय ९२) यांनी आपल्या राहत्या घरावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण १३५ व्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते केले.
याबाबत सविस्तर असे की, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त शिक्षक उत्तम रामजी इंगळे यांनी आपल्या ‘इच्छापूर्ती निवास’ या घरावर स्वखर्चाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचे अर्धाकृती पुतळे बसवून विधिवत पूजन व अभिवादन केले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष भागवतराव नरवाडे, एसटी चालक भागवतराव वाघ, किशोर नरवाडे, संजय सरकटे, संघपाल इंगळे, धर्मपाल इंगळे, संदीप खरात, गजानन राऊत, भागवत सरकटे तसेच इंगळे परिवाराच्या उपस्थितीत पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. यानंतर इंगळे परिवाराकडून खिरीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
घरावर पुतळा बसवल्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. डॉ. आंबेडकरांचे विचार, कार्य, कर्तृत्व व नेतृत्व अनमोल असून त्यांचे अनुकरण देश आणि सर्व समाजासाठी उपयुक्त ठरत असल्याची भावना इंगळे यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्त शिक्षक इंगळे यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.