– शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध रविकांत तुपकरांचा एल्गार; ‘सह्याद्री’च्या कुशीतून फुंकले क्रांतीचे रणशिंग!
– दोन दिवसांच्या वैचारिक मंथनानंतर ‘क्रांतिकारी’चे मावळे रणांगणात सज्ज; सरकारला थेट १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!
महाबळेश्वर (बाळू वानखेडे): आखाती देशांत युद्धाचे ढग दाटले असतानाच, महाराष्ट्राच्या काळ्या मातीतही अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली एक नवी ठिणगी पडली आहे! बळीराजाला वाऱ्यावर सोडून सत्तेच्या मग्रुरीत मश्गूल असलेल्या सरकारविरुद्ध युवा नेते रविकांत तुपकर यांनी आता थेट शड्डू ठोकला आहे. “सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा निर्लज्ज प्रकार असून, या जुलमी व्यवस्थेला गाडण्यासाठी आता ‘आरपारची लढाई’ लढली जाईल,” अशी सिंहगर्जना ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. महाबळेश्वरच्या सह्याद्री रांगांमधून त्यांनी सरकारला १५ दिवसांची मुदत देत संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे ८ आणि ९ एप्रिल रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे दोन दिवसीय राज्यस्तरीय धगधगते प्रशिक्षण शिबीर पार पडले. सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा नीच प्रयत्न सुरू केला असतानाच, तुपकरांनी राज्यभरातून जमलेल्या आपल्या निवडक मावळ्यांमध्ये संघर्षाची नवी ऊर्मी भरली. “आता दडपशाही खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा देत तुपकरांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ दिला असून, राज्यभर नवी आणि आक्रमक फौज उभारण्याची घोषणा केली आहे.
आपल्या आक्रमक भाषणात तुपकरांनी सरकारचा अक्षरशः पंचनामा केला. “आम्हाला अटी-शर्तींच्या विळख्यात अडकलेली आणि तोकडी ‘भीक’ नको! सरसकट ५ लाखांची कर्जमाफी आणि प्रामाणिक कर्जदारांना दीड लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेच पाहिजे,” असा वज्रनिर्धार त्यांनी व्यक्त केला. सोयाबीन, कापूस, ऊस आणि कांद्याला जोपर्यंत घामाचा दाम मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
“आजचे सरकार ईडी आणि यंत्रणांचा धाक दाखवून लोकशाहीचा गळा घोटत आहे. ही परिस्थिती आणीबाणीपेक्षाही भीषण आहे,” अशा कडक शब्दांत तुपकरांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. “सत्तेसाठी लाचार होणारे आम्ही नाही; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
रविकांत तुपकर म्हणजे शेतकरी चळवळीचा ‘बावनकशी हिरा’!
यावेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हसे यांनी कार्यकर्त्यांना साद घालताना म्हटले की, “येणारा काळ ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चाच असेल. ज्या माणसाने ३० वर्षे घरादारावर तुळशीपत्र ठेवून जेल आणि पोलिसांचा मार सोसला, तो चळवळीचा ‘बावनकशी हिरा’ आहे. अशा खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी आता ताकदीने उभे राहण्याची वेळ आली आहे.”
तुपकरांची रणगर्जना: मुख्य मागण्या आणि रणनीती
- आरपारचा लढा: सरसकट ५ लाख कर्जमाफी आणि उत्पादनावर आधारित हमीभावासाठी अंतिम लढा.
- अल्टिमेटम: १५ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ!
- फौजफाटा: राज्यभर झंझावाती दौरा करून नवी, आक्रमक संघटनात्मक बांधणी करणार.