-केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आ. श्वेता महाले यांची प्रमुख उपस्थिती
चिखली (महेंद्र हिवाले) : आई रेणुका मातेच्या पवित्र यात्रा महोत्सवानिमित्त चिखली नगरी भक्तीभावाने न्हाऊन निघाली. शहरातून मार्गस्थ झालेल्या वहन मिरवणुकीचे खामगाव चौफुली येथे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात चिखली शहर महायुतीच्या वतीने पुष्पवृष्टी करून भाविकांचे स्वागत करण्यात आले.
केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा अधिक भव्य झाला. पुष्पवृष्टीच्या वेळी वातावरणात श्रद्धा, भक्ती व आनंद यांचा संगम अनुभवायला मिळाला. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान व आई रेणुका मातेच्या कृपेची झलक दिसून येत होती. आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी आई रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होत सर्व भाविकांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
यावेळी विद्याधर महाले (मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव), नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, शहरप्रमुख विलास घोलप, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, कपिल खेडेकर, राहुल सवडतकर, भास्कर राऊत, बळीराम काळे, मायाताई म्हस्के (जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी), कैलास भालेकर, श्रीकांत टेहरे, राजेश पवार, अमोल ढोरे पाटील यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.