-भव्य स्वागत, मोटारसायकल रॅलीतून जल्लोष; धार्मिक व सामाजिक कार्याची दखल
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : श्री क्षेत्र भगवानगडाच्या ज्ञानेश्वरी विद्यापीठातील विद्यार्थी ह.भ.प. श्री. केशव महाराज शास्त्री भगत यांची राणेगाव येथील जय हनुमान संस्थानच्या महंतपदी नियुक्ती करण्यात आल्याने परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राणेगाव ग्रामस्थांच्या विनंतीनुसार ही निवड ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी आपल्या शिष्याचे तोंडभरून कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केशव महाराजांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर राणेगाव परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. श्री क्षेत्र भगवानगड ते राणेगाव दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. “जय हनुमान” आणि संत भगवानबाबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. राणेगावमध्ये आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करत महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले. नूतन महंत केशव महाराज शास्त्री भगत यांनी आपल्या भावना व्यक्त करत, “माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. संस्थानच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपत समाजसेवा अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न करेन,” असे सांगितले.
यावेळी महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवानगडाच्या विद्यार्थ्यांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “भगवानगडाचा प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानरूपी मोगऱ्याची कळी आहे. ज्ञानेश्वरी विद्यापीठात त्या कळीचे सुंदर फुलात रूपांतर होते आणि त्या सुगंधाचा लाभ संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे.” या कार्यक्रमास श्री क्षेत्र भगवानगडाचे प्रधानाचार्य ह.भ.प. श्री. नारायण महाराज शास्त्री यांच्यासह विविध महंत, साधक मंडळी आणि राणेगाव परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते