-संगीतप्रेमींना रिझविले; राजे श्री छत्रपती कराओके सिंगर ग्रुपचे आयोजन
वर्धा(प्रकाश कथाळे) : राजे श्री छत्रपती कराओके सिंगर ग्रुपतर्फे आयोजित विदर्भस्तरीय कराओके हिंदी फिल्म गीतगायन स्पर्धेत आशिष कैथवास हा विजेता ठरला. या स्पर्धेत विविध जिल्ह्यांमधील तब्बल ७५ स्पर्धक सहभागी झाले. दादाजी धुनिवाले मठ सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेचा संगीतरसिकांनी मनमुराद आनंद लुटला.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ७५ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी १६ स्पर्धकांची परीक्षकांनी अंतिम फेरीकरिता निवड केली. अंतिम फेरीत सर्व स्पर्धकांना त्यांनी दिलेल्या आवडत्या तीन गाण्यांपैकी एक गाणे सादर करण्यास सांगण्यात आले. विदर्भातील उदयोन्मुख गायकांच्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेत यवतमाळचा आशिष कैथवास याने प्रथम क्रमांक मिळवला. नागपूरच्या तनीष गजभिये याने द्वितीय, अमरावतीच्या पलक ढगे हिने तृतीय, तर वर्ध्याच्या विदिशा वाटकर हिने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. प्रथम पुरस्कार ११,००१ रुपये (विनय संगई), द्वितीय ७,००१ रुपये (सोनाली अनासाने), तृतीय ५,००१ रुपये (डॉ. मोना सुने) आणि चतुर्थ ३,००१ रुपये (अनिल महल्ले) यांनी प्रायोजित केले होते. तसेच २,००० रुपयांची चार प्रोत्साहनपर बक्षिसे योगिता मानकर, रिमा महल्ले, मेघा कोकाटे व राजे श्री छत्रपती ग्रुपतर्फे प्रदान करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत गिरीश सावळकर व श्वेता सावळकर यांनी अंतिम फेरीत निवड न झालेल्या दोन दिव्यांग मुलींना प्रत्येकी १,५०० रुपयांचे वैयक्तिक प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे मनोबल वाढविले.
स्पर्धेच्या उद्घाटनाला ॲड. विजय बेदरकर, प्रभाकर उगेमुगे, दिलीप मेने, भारती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. बक्षीस वितरण सोहळ्यास नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, सेलूचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर, प्रसिद्ध व्यावसायिक कमलेश ठक्कर, बाबाराव तुमसरे, वरिष्ठ पत्रकार नरेश डोंगरे, संदीप पजई, विनय संगई आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्येष्ठ समाजसेवी सुनील बुरांडे, संजय तिगावकर, गिरीश सावळकर, गिरीश वानखेडे, विक्रांत भागवतकर, महेश मुधोळकर, मेघळ अनासाने, अतुल पिसे, मेघा कोकाटे, रिमा महल्ले व योगिता मानकर यांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या प्रथम फेरीचे परीक्षण तबला वादक श्याम सरोदे व गायिका स्वाती निधेकर यांनी केले, तर अंतिम फेरीचे परीक्षण नितीन वाघ व केतकी कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन किरण पटेवार व ज्योती भगत यांनी केले.