-चिखली व बुलढाणा तालुका आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय..
चिखली (महिंद्रा हिवाले) : चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली व बुलढाणा या दोन्ही तालुक्यांत येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी आज दोन्ही तालुक्यांत स्वतंत्र पाणीटंचाई आढावा बैठका घेतल्या. संबंधित विभागांचा सखोल आढावा घेऊन आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. चिखली तालुक्यातील उपाययोजनांना वेग
चिखली तालुक्यासाठी श्रीराम नागरी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृह, चिखली येथे आढावा बैठक घेण्यात आली. आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले की, जेथे गरज असेल तेथे जीएसडीमार्फत बोअर घेण्याची व्यवस्था करण्यात येईल. एमएसईबीशी संबंधित अडचणी तत्काळ सोडवाव्यात, पाणीपुरवठा योजनांना सहकार्य करावे आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत लाईन कट करू नये, जेणेकरून नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत राहील, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
या बैठकीत पळसखेड जयंती, दिवठाणा, पेठ, बोरगाव वसू, साकेगाव, बोरगाव काकडे, मंगरुळ नवघरे, असोला नाईक, उत्रादा व आमखेड या गावांमधील विहीर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेला विहीर अधिग्रहणाचा निधी येत्या आठ दिवसांत प्राप्त होणार असून, तो मिळताच तत्काळ वाटप करण्यात येईल, अशी माहिती आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी यावेळी दिली. या बैठकीस गटविकास अधिकारी समाधान वाघ, तहसीलदार विजय सवडे, उपजिल्हाधिकारी सौरभ गावंडे, नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष भाजप संजय गाडेकर, तालुका अध्यक्ष भाजप डॉ. कृष्णकुमार सपकाळ, जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा संतोष काळे, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा नीरज गायकवाड, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संतोष परिहार, उपकार्यकारी अभियंता पाणीपुरवठा अनिल चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी गजानन पोफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बुलढाणा तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी तातडीचे निर्देश
बुलढाणा तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी धाड येथे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा तालुका पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. हातपंप दुरुस्ती, विहीर अधिग्रहण, विहीर दुरुस्ती, पाइपलाईन अशा विविध उपाययोजना तत्काळ राबवून नागरिकांना सुलभ पाणीपुरवठा करावा, असे निर्देश आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी दिले. जलजीवन मिशनअंतर्गत ३४ पैकी १६ गावांच्या योजना पूर्ण झाल्या असून, उर्वरित प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे आमदार सौ. महाले पाटील यांनी बजावले. केंद्र सरकारने प्रलंबित निधी दिला असून, तो लवकरच संबंधित विभागाला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील योजनाही तत्काळ पूर्ण कराव्यात, असे महत्त्वाचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीस गटविकास अधिकारी अमिता पवार, जिल्हा उपाध्यक्ष भाजप देविदास पाटील जाधव व संजय गाडेकर, नायब तहसीलदार अनंता पाटील, श्रीरंग अण्णा वेंडोले, ॲड. सुनील देशमुख, तालुका अध्यक्ष भाजप अनिल जाधव, जिल्हाध्यक्ष व्हीजेएनटी सेल योगेश राजपुत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नीलेश गुजर, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा प्रदीप टाकसाळ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल वीसपुते व अमोल शिंदे, उपअभियंता पाणीपुरवठा नीतेश खुसाळकर, उपकार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण किरण पाटील, महावितरण उपकार्यकारी अभियंता कायदे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस निलेश देठे, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू वाघ, किरण सरोदे, संदीप उगले तसेच तुळशीराम काळे, विष्णू उगले, गणेश बाजी, किशोर साखरे, दिगंबर जाधव, राजू नाटेकर, बबलू वाघुर्डे, प्रवीण वाघ, जितेंद्र तायडे यांच्यासह सरपंच व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.